होमपेज › Belgaon › बँकिंग क्षेत्र विश्‍वासावर अवलंबून

बँकिंग क्षेत्र विश्‍वासावर अवलंबून

Published On: Dec 27 2017 1:23AM | Last Updated: Dec 26 2017 10:48PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

केंद्र सरकारने 2016 मध्ये ठेवीबाबत वित्तीय विधेयक तयार केलेे. या विधेयकात शंका घ्यायला अनेक जागा आहेत. यामुळे विधेयक जनविरोधी असल्याचा सल्ला केंद्र सरकारला तज्ज्ञांनी दिला आहे. परिणामी भविष्यात विधेयक लोकसभेत सादर होण्याची  शक्यता कमी आहे. विधेयकामुळे बँकिंंग व्यवस्थेलाच धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. बँकिंग  हे विश्‍वासावर अवलंबून असते, असे मत कोल्हापूर येथील अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी मांडले. कॉ. कृष्णा मेणसे पुरोगामी व्यासपीठातर्फे डॉ. पी. डी. कुलकर्णी स्मृती व्याख्यान मंगळवारी मराठी विद्यानिकेतच्या सभागृहात झाले. त्यावेळी डॉ. पाटील यांनी ‘बँकिंग फेरबदल, ठेवीदारांचे काय?’ या विषयावर विवेचन केले. अध्यक्षस्थानी कोवाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर होते.

डॉ. पाटील यांच्या हस्ते डॉ. पी. डी. कुलकर्णी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कामगारनेते कॉ. एम. एम. सुंदरम यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. डॉ. पाटील म्हणाले, विधेयकामध्ये अनेक शंकास्पद बाबी होत्या. यामुळे जनभावना लक्षात घेऊन त्याचे कायद्यात रुपांतर होण्याची शक्यता कमी आहे. कोणत्याही देशाचे धोरण सताधारी पक्षाच्या तत्त्वानुसार ठरविण्याचा प्रयत्न होतो. लोकप्रतिनिधींची असणारी बांधिलकी, प्रशासकीय व्यवस्था, सल्लागारांची असणारी निष्ठा, विरोधी पक्षाची जागरूकता व माध्यमांचा निष्पक्षपातीपणा हे धोरण ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

वित्तीय विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्याची शक्यता नाही. यामध्ये वित्तीय संस्थेची अडचण निर्माण झाल्यावर त्यांची सोडवणूक करण्याच्या व्यवस्थेत ठराविक उपभोक्त्यांना संरक्षण देण्याचे प्रयोजन आहे. ठराविक उपभोक्त्यांना संरक्षण देण्याच्या तरतुदीमुळे या विधेयकामध्ये शंका घेण्यास वाव मिळतो. सर्व ठेवीदारांना संरक्षण देण्याची तरतूद अत्यावश्यक आहे. बँकिंग क्षेत्र विश्‍वासावर चालते. बँकेचा ग्राहकावर व ग्राहकाचा बँकेवर विश्‍वास असणे अत्यावश्यक आहे. यावर बँकेंची प्रगती अवलंबून असते. आठ लाख कोटीचे कर्ज उद्योजकांमुळे बुडित गेले, असे ते म्हणाले. अध्यक्ष डॉ. निळपणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्राचार्य आनंद मेणसे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन इंद्रजित मोरे यांनी तर आभार नागेश सातेरी यांनी मानले.