Tue, Mar 19, 2019 10:05होमपेज › Belgaon › ऑटोनगरातील कोल्ड स्टोरेजवरून वादंग

ऑटोनगरातील कोल्ड स्टोरेजवरून वादंग

Published On: Feb 28 2018 1:17AM | Last Updated: Feb 28 2018 12:55AMबेळगाव : प्रतिनिधी    

ऑटोनगर येथील कत्तलखाने आणि कोल्ड स्टोरेजच्या कारभाराबद्दल आक्षेप घेऊन दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरुन कोल्ड स्टोरेजमधून जनावरांचे मास जप्‍त करण्यात आले आहे. हे मांस कोणत्या जनावराचे आहे, याचा  तपास सुरु आहे. मात्र, पंचनाम्यादरम्यान पोलिस प्रशासनाने दबावाला बळी पडून कारवाई केल्याचा आरोप करत प्राणिमित्र आणि भाजप कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांच्या कारभाराचा निषेध केला. यामुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. ऑटोनगर येथील तीन कोल्ड स्टोरेजमधून जनावरांच्या मांसाची नियमबाह्यरित्या निर्यात केली जातेे, असा आरोप करत बंगळूर येथील प्राणी दया संघटनेचे जोशेन अ‍ॅन्टोनी (रा.बोमनहळी  बंगळूर) तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार माळमारुती पोलिसांनी सदर कत्तलखान्यांवर सोमवारी 26 रोजी धाड टाकून कोल्ड स्टोरेजमधील मांस जप्त केले होते. सृष्टी अ‍ॅग्रो कोल्डस्टोरेज, नाईल अ‍ॅग्रो कोल्ड स्टोरेज व सेव्हन स्टार कोल्ड स्टोरेजवर छापा टाकला होता. तसेच पोलिस बंदोबस्त ठेवून मांसाची ने-आण थांबविली होती. मंगळवारी या स्टोरेजमधील जनावरांच्या मांसाचा पंचनामा करण्यात आला. मात्र, यावेळी पोलिसांकडून पक्षपात करण्यात येत असल्याचा आरोप करत प्राणी दया संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले. 

पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली.  तक्रारदार पक्षाच्या बाजूने केवळ दोघा जणांनाच पंचनाम्यासाठी स्टोरेजमध्ये प्रवेश देण्यात आला होता. तर स्टोरेज मालकांच्या बाजूने अनेकजण उपस्थित होते. तक्रारदारांच्या वकिलांनाही प्रवेश देण्यात आला नसल्याने प्राणीदया संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर आरोप केला.  मात्र, पोलिस एसीपी शंकर मारीहाळ यांनी सदर कार्यकर्त्यांना आत जाण्यास परवानगी दिली नाही. 

काही वेळानंतर घटनास्थळी भाजपचे अ‍ॅड. अनिल बेनके, किरण जाधव, डॉ. रवि पाटील, राजेंद्र हरकुणी, उज्वल बडवान्‍नाचे आदींनी धाव घेऊन पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला व कारवाई पारदर्शकपणे करावी, अशी मागणी लावून धरली. यामुळे या ठिकणी काही काळ तणाव निर्माण झाला होता. उपायुक्‍त महानिंग नंदगावी, गुन्हे विभागाचे श्रीनिवास गड्डेकर, यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर प्राणी दया संघटनेच्या मागणी नुसार कार्यकर्त्यांना आत प्रवेश देण्यात आला.  पशुवैद्यकीय खात्याच्या डॉ.अनंत पाटील व इतर अधिकार्‍यांकडून स्टोरेजमधील जनावराच्या मांसाची तपासणी करुन पंचनामा करण्यात आला आहे.