Sun, Aug 25, 2019 02:35होमपेज › Belgaon › विचार स्वातंत्र्याची गळचेपी धोकादायक

विचार स्वातंत्र्याची गळचेपी धोकादायक

Published On: Dec 11 2017 1:27AM | Last Updated: Dec 10 2017 11:33PM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी

साहित्यिकांचा आवाज दाबण्याचे  काम सातत्याने सुरू आहे. इंग्रजांनी ‘कीचकवध,’ पूर्वीच्या सरकारने ‘सॅटेनिक व्हर्सेस,’ तर आताच्या सरकारने ‘पद्मावती’वर बंदी घातली. हा प्रकार विचार दाबण्याचा असून विचार स्वातंत्र्याची गळचेपी सुरू आहे. हे धोकादायक असून, साहित्यिकांनी सामान्य जनतेच्या हातात बंडाचा झेंडा घेण्याचे काम करावे, असे प्रतिपादन नाट्य दिग्दर्शक, लेखक अभिराम भडकमकर यांनी केले. 

बेळगुंदी येथील श्री रवळनाथ साहित्य अकादमी आयोजित 12 व्या साहित्य संमेलनाच्या पहिल्या सत्रात अध्यक्षीय भाषणात भडकमकर बोलत होते. ते म्हणाले, धार्मिक गटाकडून आजही साहित्यकांची गळचेपी केली जात आहे. वैयक्तिक फायद्यासाठी समाजाला डिवचण्याचे प्रयत्न सुरू असून, मतामतांचा गलबला सुरू आहे. या प्रतिकूल काळात साहित्यिकांनी समाजभान राखून आवाज उठविला पाहिजे. साहित्य हे क्रांतीकडे जाणारे हवे. उत्क्रांतीकडे नको. जबाबदारीचे भान राखून समाजाच्या कळवळ्यातून केलेले लेखन कायम राहते. ही तळमळ ज्ञानेश्‍वर, तुकाराम यांच्यासारख्या संतांच्या साहित्यात आढळते. यामुळेच हे साहित्य आजही चिरंतन आहे. 

सामान्य माणूस केवळ जगत असतो. साहित्यिक हा जगताना काही तरी मांडत असतो. समाज स्पंदने टिपतो. कागदावर लिहिलेले शब्द म्हणजे साहित्य नसते; परंतु जे जगण्यातून व्यक्त होते. साहित्यात जगण्याचे वास्तव साहित्यातून मांडणे आवश्यक आहे. साहित्य हे अश्रूंशी नाते जोडते, असे भडकमकर म्हणाले. मसाहित्यिक आणि शेतकरी यामध्ये फरक नसतो. ते नवे विचार मांडतात. लोकांनी हातामध्ये झेंडे घ्यावेत, यासाठी साहित्य काम करते.  विचारातून क्रांती होते. त्यातून सामान्य माणसाला लढण्याचे बळ मिळते. प्रत्येकाला जगणे सुंदर असणे महत्त्वाचे वाटते; पण अर्थपूर्ण असावे असे वाटत नाही, हे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले.