Tue, Apr 23, 2019 01:37होमपेज › Belgaon › शिवजयंतीला आचारसंहितेचा ‘ब्रेक’

शिवजयंतीला आचारसंहितेचा ‘ब्रेक’

Published On: Apr 07 2018 1:40AM | Last Updated: Apr 06 2018 11:43PMबेळगाव ; प्रतिनिधी

शहरातील शिवजयंती उत्सवाला वैभवशाली परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याचे कार्य बेळगावातील शिवभक्तांनी केेले असून परंपरेला साजेशी चित्ररथ मिरवणूक काढण्याचा निर्णय यंदाही झाला. मात्र विधानसभेची आचारसंहिता लागू असल्याने अडसर असून 17 एप्रिल रोजी शिवपूजन व जन्मोत्सव तर निवडणूक निकालानंतर 19 मे रोजी चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे.
उपरोक्त निर्णय शुक्रवारी जत्तीमठ येथे आयोजित केलेल्या मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी दीपक दळवी होते.

राज्यात विधानसभेच्या निवडणुका 12   मे रोजी होणार आहेत. 15 रोजी मतमोजणी असून 17 पर्यंत आचारसंहिता लागू आहे. या काळात चित्ररथ मिरवणूक काढण्यात कायद्याचा अडसर येत आहे. त्यामुळे मिरवणूक 19 मे रोजी काढण्यात येणार आहे. दीपक दळवी म्हणाले, महाराष्ट्राबाहेर सर्वाधिक उत्साहाने शिवजयंती उत्सव बेळगावात साजरा केला जातो. यामध्ये 60 हून अधिक चित्ररथ सहभागी होतात. प्रत्येक गल्लीत जयंती साजरी होते. बेळगाव शहरातील नागरिकांच्या नसानसात शिवप्रेम भिनलेले  आहे.

यावेळी विधानसभा निवडणुकीचा अडसर शिवजयंतीला येत असून कायद्याच्या कचाट्यात कार्यकर्ते सापडू नयेत, यासाठी आचारसंहिता संपल्यानंतर चित्ररथ मिवरणूक काढण्यात  येईल. रणजित हावळण्णाचे म्हणाले, चित्ररथ मिरवणुकीला ढोलपथकांचा अडसर येत आहे. एकाच ठिकाणी ढोलपथक थांबत असल्यामुळे मिरवणुकीला विलंब होतो. चित्ररथ पहण्याची संधी शिवभक्तांना मिळत नाही. यामुळे ढोलपथकांच्या संख्येवर मर्यादा आणा. यासाठी मंडळाने वेगळी स्पर्धा आयोजित

 करावी. सुनील जाधव म्हणाले, चित्ररथ मिरवणुकीतील शिवचरित्र दाखविण्याचा प्रयत्न मंडळांकडून होतो. यासाठी मिरवणूक वेळेत सुरू होणे अपेक्षित आहे.  शिवराज पाटील, माजी नगरसेवक गजानन पाटील, अरुण कानूरकर, राजू शेट्टी, रणजित चव्हाण-पाटील, मदन बामणे यांनी विविध सूचना मांडल्या. बैठकीला प्रकाश मरगाळे, नगरसेवक विजय पाटील, गुणवंत पाटील, विकास कलघटगी, श्रीरामसेनेचे जिल्हाध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, एपीएमसी सदस्य महेश कुगजी, पांडुरंग पट्टण, सतीश देसाई उपस्थित  होते.
 

 

 

tags ; Belgaum,news,assembly, Code,Conduct, applies, Shiv, Jayanti, celebration, procession,Break