Fri, Apr 26, 2019 09:53होमपेज › Belgaon › हर फिक्र को धुए मे उडाता चला गया

हर फिक्र को धुए मे उडाता चला गया

Published On: Jan 14 2018 1:51AM | Last Updated: Jan 13 2018 11:22PM

बुकमार्क करा
बेळगाव :  श्रीकांत काकतीकर

बेळगाव परिसरात होत असलेल्या अंमली पदार्थाच्या तस्करीवरुन आता नवनवी माहिती पुढे येत आहे.देशातील 20 स्मार्ट शहरांपैकी एक असलेल्या बेळगाव शहरात चक्‍क गांजा पार्क सुरु असल्याच्या माहितीने बेळगावकरांची  झोपच उडाली आहे.‘हर फिक्र को धुएमे उडाता चला गया’ या गाण्याप्रमाणे आजची तरूणाई गांजाकडे ओढली गेल्याचे विदारक चित्र बेळगावात पाहायला मिळत आहे. सिगारेटचे दर वाढल्यानंतर पॉकिटमनी कमी पडू लागला. त्यातून अनेक तरुणांना तीस ते साठ रुपयांत मिळणार्‍या गांजाच्या पुडीने आपल्या जाळ्यात ओढले आहे. हेरॉईन, हशीश, अफीम, मारीजुआनासारख्या किमती नशिल्या पदार्थांचे आकर्षण असले तरी ते विकत घेण्याची ऐपत नसल्याने महाविद्यालयासमोर सिगारेटचा धूर काढणार्‍यांची संख्या वाढू लागली.

सिगारेटचे दर वाढले, सिगारेटच्या एका पाकिटासाठी शंभर दीडशे रुपये खर्च करणे अवघड झाले. त्याबरोबरच नशेच्या अधीन झालेल्यांना गांजाची ओढ लागली. तीस ते साठ रुपयांत मिळणार्‍या गांजाच्या पुडीची मागणी वाढली. शहरात काही वर्षांपूर्वीपर्यंत गांजा ओढणार्‍यांची संख्या मर्यादित होती. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांत बेळगाव शहरात गांजाला मागणी वाढली. महागड्या नशिल्या पदार्थांची तस्करी करणार्‍यांनी आतापर्यंत गांजाकडे दुर्लक्ष केले होते.

मात्र, गांजाची मागणी वाढल्याचे पाहून अंमली पदार्थ तस्करीतील अनेक बडी धेंडे आता गांजा तस्करीत उतरले आहेत. यापूर्वी शेतामधून अन्य पिकांत गांजा उगवला जायचा. मात्र, पोलिस कारवाईच्या भीतीने शेतातील गांजा कमी झाला होता. गेल्या काही वर्षांत गांजाची मागणी वाढली. त्याचबरोबर बेळगाव जिल्ह्यातील अनेक भागांतील शेतात गांजाही वाढला. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग, गोकाक, अथणी, रामदुर्ग, बैलहोंगल, आणि बेळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या तालुक्यातील शेतात अन्य पिकांत गांजा उगविला जात आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागाबरोबरच महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील मिरज आणी गोवा कर्नाटक सीमेवरील दोडामार्ग,चोर्ला याभागातून बेळगावात गांजा आणला जात आहे.  

बेळगाव शहरात गांजा विक्रीने टोक गाठले आहे.  खंजर गल्लीसारख्या मध्यवर्ती भागात ‘मनपा’च्या खुल्या जागेतच गांजाची सरेआम विक्री होते.त्याभागातील नागरिकांना त्याची पूर्ण माहिती आहे. गांजा पार्कमधील काळ्या धंद्याविरोधात स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रारही केली आहे.त्यानंतर पोलिसांनी नेहमीप्रमाणे कारवाईचे नाटकही केले. काही दिवसांनतर गांजा पार्कमधील नशेचा धूर पुन्हा सुरु आहे.