Tue, Jul 16, 2019 01:37होमपेज › Belgaon › मतदार याद्यांची दुरुस्ती तातडीने करा

मतदार याद्यांची दुरुस्ती तातडीने करा

Published On: Jan 23 2018 1:16AM | Last Updated: Jan 22 2018 10:30PMबेळगाव : प्रतिनिधी

मतदार याद्यांमध्ये नवीन मतदारांची नावे समाविष्ट करावीत व मृत्यू पावलेल्या मतदारांची नावे  वगळावीत, कोणत्याही मतदाराचे नाव यादीतून वगळण्यात येवू नये . त्याशिवाय बोगस मतदारांची नावे तपासून ती कमी करावीत, याप्रकारच्या सूचना बेळगाव जिल्हा मतदार याद्यांचे पर्यवेक्षक व भूमापन, भूदाखले खात्याचे आयुक्त  मुनिष मौदगिल यांनी अधिकार्‍यांना केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी मतदार यादी दुरुस्तीबाबत विशेष बैठक आयोजित केली होती. त्यावेळी मुनिष मौदगिल यांनी अधिकार्‍यांना विविध सूचना केल्या.

ते म्हणाले, 18 वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांची नावे नोंदवावीत  त्याशिवाय एकाच मतदारांची नावे अनेक ठिकाणी असतील तर त्यांची शहानिशा करावी. मतदार याद्यांमध्ये नावात चुका, चुकीचा पत्ता अशा अनेक चुका आहेत. त्या चुका दूर कराव्यात. मतदारांची नावे अधिक ठिकाणी असतील तर आधारकार्डची पाहाणी करून त्याप्रमाणे एकाच ठिकाणी नोंद व्हावी. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार याद्या तपासणीचे कामकाज 22 पर्यंत समाप्त होत असले तरी नाव नोंदणीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापासून सात दिवसापर्यंत यादीत नव्याने नाव नोंदणी करण्याची संधी असल्याची माहिती मौदगिल यांनी  दिली.

मागील निवडणुकीमध्ये  कमी मतदान झालेल्या  केंद्रामध्ये नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.  मतदान करण्यास येणार्‍यांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मतदार याद्यातील दुरुस्त्यांची माहिती मतदारांना देण्यासाठी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ग्रामसभा घेण्यात येतील, असे जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष व जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन यांनी बैठकीत दिली. मतदार यादीतील पडताळणीबाबत व विशेष अभियानाबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांनी माहिती दिली व जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणच्या मतदार याद्यातील चुकाबद्दल माहिती आढळून आल्यास त्याबद्दल त्वरित आपल्याला राजकीय पक्षांनी माहिती द्यावी, असे आवाहनी जिल्हाधिकार्‍यांनी  केले आहे.