Fri, Apr 19, 2019 12:38होमपेज › Belgaon › बेळगाव विमानसेवेचेच लँडिंग?

बेळगाव विमानसेवेचेच लँडिंग?

Published On: Apr 09 2018 1:32AM | Last Updated: Apr 09 2018 12:46AMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव विमानतळावरून सुरू असणारी विमानसेवा येत्या 14 मे पासून बंद करण्यात येणार आहे. त्याचा परिणाम शहराच्या विकासावर होणार असून विमानतळ प्राधिकारणाने बेळगाव विमानतळावरून सुरू असणार्‍या फेर्‍या कायम सुरू ठेवण्याची मागणी सिटीझन कौन्सिलतर्फे रविवारी विमानतळ प्राधिकारणाच्या अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

उपरोक्त मागणीचे निवेदन रविवारी अधिकार्‍यांना देण्यात आले.यावेळी विमानसेवा रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली.अधिकार्‍यांनी याबाबत प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले.

बेळगाव शहर कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर वसले आहे. शहर झपाट्याने वाढत असून याठिकाणी अनेक शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे देशभराबरोबर परदेशातूनही अनेक विद्यार्थी शिक्षण घेेण्यासाठी येतात. औद्योगिक प्रगती झपाट्याने होत आहे. अनेक अत्याधुनिक सुविधा आहेत. याला विमानसेवा पुरक आहे. याचा अनेकजणांना फायदा होत आहे. मात्र प्रशासनाने विमान रद्द करण्याचा घेतलेला निर्णय योग्य नव्हे. यामुळे शहराचा विकास खुंटण्याचा धोका आहे. उद्योगधंदे शहराबाहेर जातील. पर्यटक व नागरिकांची रहदारी रोडावेल.

सांबरा येथून सध्या दररोज स्पाईस जेट कंपनीच्या विमानाच्या पाच फेर्‍या होतात. येथून मुंबई, बंगळूर, चेन्नई, हैद्राबाद शहरात उड्डाण होते. मात्र 14 मे पासून सदर सेवा हुबळी येथून पुरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी सांबरा विमानतळ निरुपयोगी ठरण्याचा धोका आहे. कोट्यवधी रुपये खर्चून विमानतळाचे नुतनीकरण केले असून ते अडगळीची वस्तू बनेल. यासाठी हा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सिटीझन कौन्सिलचे पदाधिकारी सतीश तेंडोलकर, बसवराज जवळी, सेवंतीलाल शहा आदी उपस्थित होते. निवेदन सांबरा विमानतळाचे अधिकारी मौर्य यांना देण्यात आले.