Fri, Mar 22, 2019 05:34
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › दलाल मालामाल; बळीराजा कंगाल 

दलाल मालामाल; बळीराजा कंगाल 

Published On: Feb 04 2018 9:57PM | Last Updated: Feb 04 2018 9:19PMबेळगाव :प्रतिनिधी

केंद्र सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पात शेतीला सर्वोच्च  प्राधान्य देण्याचा वादा आहे. यासाठी विशेष निधीची तरतूद करून शेतकर्‍यांच्या विकासाचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या कृषी मालाला योग्य भाव मिळत नसल्याने दलाल मालामाल तर बळीराजा कंगाल बनत चालला आहे. सरकार आर्थिक तरतूद करत असले तरी काबाडकष्ट करणारा शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करीत आहेत. मग शेतकरी विकासाचे धोरण गेले कुठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.  राज्यातील असो वा केंद्रातील सरकारांनी शेतकर्‍यांच्या विकासाला चालना देण्याचे आश्‍वासन दिले आहे. प्रत्यक्षात त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. टोमॅटोला भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी तो मोफत देऊन सरकारच्या डोळ्यात अंजन घातले आहे.  

बाजारात टोमॅटोसह भाजीपाल्याचा भाव घसरल्याने शेतकर्‍यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. बाजारपेठेत टोमॅटोचा भाव प्रति 10 किलो 60 ते 70 रु. मिळत आहे. याच्या उत्पादनासाठी शेतकर्‍यांनी केलेला खर्चही निघत नाही. उलट कामगारांची मजुरी, वाहतूक खर्च, दलालांचे कमिशन, हमाली हा खर्च पाहिल्यास शेतकर्‍यांच्या हाती काहीच उरत नाही. टोमॅटोचा भाव प्रतिकिलो एक रु.प्रमाणे आहे. यामुळे संताप्‍त शेतकर्‍यांनी शनिवारी (दि.3) जिल्हाधिकारी आवारात आंदोलन करून ट्रॉलीभर टोमॅटो मोफत वाटून सरकारच्या धोरणाचा निषेध केला.  कृषी मालाला हमी भाव मिळावा, अशी जोरदार मागणी केली आहे. 
 

परिश्रम करून विविध पिके  घेणारा शेतकरी कर्जात, तर केवळ दलाली व किरकोळ विक्री करणारे व्यापारी मालामाल आहेत. यावर सरकारने ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात येत आहे. आवक व मागणी लक्षात घेऊन सरकारने यावर  उपाययोजना आखल्या पाहिजेत. शेतकर्‍यांच्या मालाला  हमी भाव देऊन शेतकर्‍यांच्या कष्टाचे मोल जाणले पाहिजे. यासाठी कृषी उत्पादनांना हमी भाव मिळावा, अशी मागणी करण्यात येत आहे. शेतकर्‍यांच्या या प्रलंबित मागणीकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले आहे. सरकार शेतकर्‍यांच्या हितासाठी अर्थसंकल्पात तरतूद करत असले तरी प्रत्यक्षात याचा कोणताच लाभ मिळत नाही, हे वास्तव आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी नेत्यांमधून व्यक्‍त होत  आहे.  सरकारकडे प्रस्ताव पाठवणार आहे. 

- निंगाप्पा जाधव, एपीएमसी अध्यक्ष  

शेतकर्‍यांची मते घेऊन सत्तेत आलेल्यांनी शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. कृषी उत्पादनाना हमी भाव द्यावा, अशी मागणी करूनही आतापर्यंत कोणीच दखल घेतली नाही. अर्थसंकल्पातन तरतूद केवळ तोंडाला पाने पुसण्याचा प्रक्रार आहे.
 

- आप्पासाहेब देसाई, शेतकरी नेते 

दलाल, विक्रेते केट्यधीश झाले आहेत. शेतकरी मात्र कर्जातच आहे. याला सरकारचे धोरण कारणीभूत आहे. कृषी उत्पादनाना योग्य भाव देण्याची तरतूद झाली नाही. यामुळेच अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. हमी भाव दिल्यावरच शेतकर्‍यांचा विकास शक्य आहे.    

 - शंकरगौडा पाटील, शेतकरी, कडोली