Fri, Apr 26, 2019 09:25होमपेज › Belgaon › बेळगाव- वेंगुर्ला महामार्ग गैरसोयीचा

बेळगाव- वेंगुर्ला महामार्ग गैरसोयीचा

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 25 2018 8:08PMबेळगाव : प्रतिनिधी

कोकण आणि गोव्याला जोडणारा महत्त्वाचा म्हणून ओळखला जाणारा बेळगाव-वेंगुर्ला महामार्ग पावसामुळे प्रवाशांच्या गैरसोयीचा ठरला आहे. रस्त्यामध्ये ठिकठिकाणी पाणी साचत असल्याने वाहनधारकांना वाहने हाकताना कसरत करावी लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडत चालली आहे.बेळगाव शहराला नजीकच्या चंदगड, आजरा, गडहिंग्लज, सावंतवाडी आणि गोवा परिसरातील रोज शेकडो नागरिक येत असतात. त्याचबरोबर तालुक्यातील हजारो नागरिक बेळगावला वेगवेगळ्या कारणासाठी धाव घेतात. मात्र पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचत असल्याने डोकेदुखी निर्माण झाली आहे. यातून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रस्त्याची मागील वर्षी दुरुस्ती केल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी चांगला आहे. मात्र रस्ता करताना सदोष पद्धतीने कामकाज केले आहे. यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचते. या पाण्यातूनच नागरिकांना ये-जा करावी लागते. वाहनधारक साचलेल्या पाण्यातूनच वाहने हाकतात. ते पाणी दुसर्‍या प्रवाशांच्या अंगावर उडते. यामुळे रस्त्याने प्रवास करताना खबरदारी घेऊनच प्रवास करावा लागतो.रस्त्यावरील हिंडलगा-विजयनगर येथे पाणी रस्त्यावरच साठते. त्यानंतर तुरमुरी येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचते. यातून कशा प्रकारे प्रवास करावा हा प्रश्‍न प्रवाशांना सतावत आहे. सुळगा येथे  पाणी साचत असे. त्याबाबत तक्रार केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने प्रयत्न करून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे बहुतांशी पाणी वाहून जात आहे. मात्र काही प्रमाणात पाणी साठून राहत आहे.

या रस्त्यावर प्रामुख्याने तुरमुरी येथील साचणार्‍या पाण्याची समस्या भेडसावत आहे. मागील वर्षी ग्रा. पं. अध्यक्ष नागनाथ जाधव यांनी स्वखर्चाने चर मारून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा प्रयत्न फोल गेला असून अर्ध्याहून अधिक रस्त्यावर पावसाचे पाणी साचत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत असून रस्ता दुरुस्ती त्वरित करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

नाले झाले गायब

पाण्याचा निचरा करण्यासाठी ठिकठिकाणी असणारे नाले गायब झाले आहेत. नागरिकांनी नाल्यावर अतिक्रमण करून जागे हडप केले आहेत. तर काही ठिकाणी नाल्यातून माती, कचरा टाकून मुजविले आहेत. याकडे स्थानिक ग्रा. पं. नी सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. यातून रस्त्यावर साचणार्‍या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.