Fri, Mar 22, 2019 00:05
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › साहित्यिक सीमाबांधवांच्या पाठीशी

साहित्यिक सीमाबांधवांच्या पाठीशी

Published On: Jan 29 2018 1:44AM | Last Updated: Jan 28 2018 11:22PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शहरावर प्रत्येक मराठी माणूस प्रेम करतो. महाराष्ट्रातील कोणालाही बेळगाव हे महाराष्ट्राबाहेर असल्याचे जाणवत नाही.  मराठी माणूस महाराष्ट्रात येण्यासाठी झुंज देत आहे. सीमाबांधवांच्या या लढ्यात मराठी साहित्यिक सोबत असल्याची ग्वाही ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी दिली. मराठी संवर्धन सांस्कृतिक मंडळ, पश्‍चिम विभाग यांच्यावतीने रविवारी विजयनगर येथील संत मीरा मराठी शाळेच्या प्रांगणात पाचवे फिरते साहित्य संमेलन पार पडले. त्यावेळी संमेलनाध्यक्ष या नात्याने म्हात्रे बोलत होते. संमेलनात सीमाप्रश्‍नी ठराव टाळ्यांच्या गजरात संमत करण्यात आला.

व्यासपीठावर स्वागताध्यक्ष शिवाजी अतिवाडकर, उद्घाटक सुरेश रेडेकर, अशोक तरळे, तानाजी पाटील, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, आकाश किणेकर, साहित्यिक नारायण सुमंत, शांतीनाथ मांगले आदी उपस्थित होते. म्हात्रे म्हणाले, बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्राचाच आहे, अशी आमची ठाम भूमिका आहे. मात्र राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे प्रश्‍न रेंगाळला आहे. कर्नाटक सरकार अतिरेकीपणा करत आहे. यामुळे बेळगाव ते कारवारपर्यंतचा प्रांत एकत्रित करून स्वतंत्र राज्य निर्माण करावे. त्या ठिकाणी मराठीचे संवर्धन होईल. ज्याप्रमाणे मुंबईसाठी संघर्ष करावा लागला, त्याप्रमाणे बेळगावसाठी करावा लागेल. यामध्ये सर्व साहित्यिक अग्रेसर असतील.

मराठीने कानडी भाषेचा कधीही दुस्वास केला नाही. द. रा. बेंद्रे नावाचा कवी मराठीने कानडीला दिला. त्यांनी कानडीतून लिहून ज्ञानपीठ पारितोषिक मिळवून दिले. हा  राठीमनाचा मोठेपणा आहे. इंग्रजीच्या भडिमारात मराठी धोक्यात आहे. मराठीचे वैभव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. मातृभाषा टिकली तरच संस्कृती टिकेल, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. सीमाप्रश्‍नासाठी सतत लढत राहा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे म्हात्रे यांनी नमूद  केले.  म्हात्रे यांनी विविध कविंच्या दर्जेदार कविता सादर केल्या. प्रास्ताविक अशोक पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश बेळगुंदकर, प्रा. एम. एम. पाटील यांनी केले. 

महाराष्ट्राने जाब विचारावा

कर्नाटकाकडून सीमाबांधवांवर अत्याचार वाढत आहेत. याचा जाब महाराष्ट्राने कर्नाटकाला विचारावा. सीमाप्रश्‍नी तोडगा काढण्याचा ठराव संमेलनात करण्यात आला. मंडळाचे कार्याध्यक्ष मधु बेळगावकर यांनी ठराव मांडला. त्याला टाळ्यांच्या गजरात संमती देण्यात आली. ठराव 1- भाषावार प्रांतरचनेवेळी सीमाभाग म्हैसूर राज्यात डांबण्यात आला. सीमाभाग म्हणजे कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आहे. गेली 60 वर्षे लोकशाही देशात  सीमाबांधव  पारतंत्र्याचे जीवन जगत आहेत. कर्नाटकाकडून सीमाभागात सांस्कृतिक विध्वंस सुरू आहे. सीमाप्रश्‍न न्यायप्रविष्ट आहे. दोन्ही राज्यांनी चर्चेद्वारे तो विनाविलंब सोडवावा.

ठराव 2- बेळगावचे नामांतर करून मराठी भाषा आणि संस्कृतीला छेद देण्याचे काम सुरू आहे. नामांतर प्रक्रिया करताना केंद्र सरकारनेही कायद्यानुसार कर्तव्य बजावलेले नाही. यामुळे बेळगावचे नामांतर घटनाबाह्य असून केंद्राने नामांतर रद्द करावे. ठराव 3- प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच मिळण्याचा घटनात्मक अधिकार असताना कर्नाटक सरकार मराठीसह इतर भाषक विद्यार्थ्यांवर प्राथमिक शिक्षणात कन्नडसक्ती लादण्याचा प्रयत्न करीत आहे. ही कृती सरकारने त्वरित थांबवावी आणि लोकशाहीच्या घटनात्मक अधिकारांचा आदर  करावा. 

ठराव 4- भाषक, सांस्कृतिक, प्रशासकीय स्तरावर कर्नाटक सरकारचे अनन्वित अत्याचार सुरू आहेत. याची गांभीर्याने दखल घेऊन महाराष्ट्राने कर्नाटक सरकारला याचा जाब विचारावा. 
 

चंद्रकांत पाटलांचा निषेध

महसूलमंत्री चंदक्रांत पाटील यांनी कानडीचे गोडवे गाऊन मराठीसाठी झुंज देणार्‍या सीमावासीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करत असल्याचे कवी अरुण म्हात्रे यांनी जाहीर केले.