Sun, Jul 21, 2019 16:12
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › शाकंभरी पौर्णिमेसाठी सौंदत्ती डोंगरावर गर्दी

शाकंभरी पौर्णिमेसाठी सौंदत्ती डोंगरावर गर्दी

Published On: Dec 25 2017 1:20AM | Last Updated: Dec 24 2017 10:44PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

यंदा शनिवार दि. 30 पासून श्रीक्षेत्र सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवीच्या शाकंभरी पौर्णिमा यात्रेला सुरुवात होत आहे. तब्बल सहा लाख भाविक यात्रेत दाखल होण्याची शक्यता आहे. यात्रेनिमित्त देवस्थान आणि जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. बेळगाव परिसरातील रेणुकाभक्तांचे जथे सौंदत्तीकडे रवाना होत आहेत. परिवहन महामंडळाच्यावतीने जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. या आठवड्याच्या अखेरीस पौर्णिमा यात्रेला सुरुवात होत आहे. यात्रा काळात राहण्याच्या जागेची अडचण ओळखून चार दिवसांपासून सौंदत्ती डोंगरावर भाविकांचे जथेे दाखल होऊ लागले होते.  बेळगाव परिसरातील भक्त जग आणि मानाची सासनकाठी घेऊन निघत आहेत.  

डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जोगनभावी कुंडावर स्नानासाठी गर्दी होत आहे. कुंडावर श्री जोगेश्‍वरी सत्यव्वा देवीचे दर्शन घेऊन लिंब नेसण्याचा कार्यक्रम उरकून भाविक डोंगरावर दाखल होत आहेत. रविवारपर्यंत दीड लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत.  यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर  स्वच्छता व इतर कामांवर लक्ष ठेवण्यात आले असून भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, याची जातीने दखल घेण्यात येत असल्याचे देवस्थानचे कार्यकारी अधिकारी रवी कोटारगस्ती यांनी सांगितले. डोंगरावरील यात्रीनिवास भाविकांनी भरले आहेत. मोकळ्या जागेवर राहुट्या उभारण्यात आल्या आहेत. 
यात्रेनिमित्त परिवहन मंडळातर्फे जादा बसेसची सोय करण्यात आली आहे.

यात्रेला जिल्ह्यासह उत्तर कर्नाटकातून लाखो भाविक येतात. यात्रेतून परिवहन मंडळाला चांगले उत्पन्न मिळते. यामुळे यात्रा काळात बेळगावसह अन्य तालुक्यातून सौंदत्तीसाठी जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. डोंगरावर रहदारीचा अंदाज घेत पोलिस प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. डोंगरावर बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे. मंदिर व्यवस्थापनातर्फे जादा सफाई कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  पाण्याची समस्या जाणवू नये, यासाठी व्यवस्थापनाला विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे.