होमपेज › Belgaon › लोकवर्गणीमधून साकारला शिवरायांचा पुतळा

लोकवर्गणीमधून साकारला शिवरायांचा पुतळा

Published On: Dec 04 2017 1:38AM | Last Updated: Dec 03 2017 8:09PM

बुकमार्क करा

बेळगाव : शिवाजी शिंदे

छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून सीमाभागातील राजकारण चांगलेच तापले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठी मते हायजॅक करण्यासाठी काही लोकप्रतिनिधी व नेत्यांनी युवक मंडळांना हाताशी धरून पुतळा देणगी स्वरूपात देण्याचे सत्र आरंभले आहे. याला सडेतोड जवाब देत काही गावांनी नवा पायंडा पाडण्याचे  प्रयत्न चालविले आहेत. राकसकोप आणि देसूर गाव आघाडीवर असून त्यांनी कोणताही नेता अथवा पक्षाला थारा न देता लोकवर्गणीतून पुतळा साकारला आहे. याचे कौतुक होत आहे.

स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवणारे छ. शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचे श्रद्धास्थान. यातून गाव तेथे शिवरायांचा पुतळा असल्याचे दिसून येते. याचा फायदा तथाकथित दानशूर नेत्यांकडून घेतला जात आहे. याला आळा घालण्यासाठी जनताच सरसावली आहे. याचा पहिला धडा राकसकोपने घालून दिला. युवकांनी एकत्र येऊन शिवपुतळा बसविण्याचा  निर्णय घेतला. गावातील प्रत्येक कुटुंबाच्या ऐपतीप्रमाणे देणगी स्वीकारण्यात आली. यामध्ये 21 पासून 21 हजार रुपयापर्यंतच्या देणग्या मिळाल्या. 

काहींनी श्रमदान करून खारीचा वाटा उचलला. गावात आठ फूट उंचीचा पुतळा साकारण्यात आला. त्याचे दोन महिन्यापूर्वी अनावरण झाले. याचाच कित्ता आता देसूर गावाने गिरविला आहे. देसूर आर्थिकदृष्ट्या संपन्न म्हणून ओळखले जाते. गावात उभारण्यात येणारा शिवपुतळा स्वखर्चातून साकारण्याचा निर्धार करण्यात आला. याला गावातील दानशुरांनी मदतीचा हात दिला. प्रत्येक घरातून आर्थिक कुवतीनुसार मदत मिळाली. पुतळ्याचे अनावरण दि.4 रोजी होणार आहे. शिवव्याख्याते व शिवसेना नेते प्रा. नितीन बानुगडे पाटील उपस्थित राहणार असून त्यांचे शिवचरित्रावर व्याख्यान होणार आहे. या दोन गावाने घालून दिलेल्या आदर्शाचे तालुक्यातून कौतुक होत आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला अथवा नेत्याला थारा न देता स्वाभिमान जपत पुतळा साकारला आहे. त्याचे अनुकरण अन्य गावांनीही करावे, अशी अपेक्षा करण्यात येत आहे.