Sun, Jun 16, 2019 03:02होमपेज › Belgaon › सुमार मतदानाने गणिते बिघडणार?

सुमार मतदानाने गणिते बिघडणार?

Published On: May 14 2018 1:42AM | Last Updated: May 14 2018 12:23AMबेळगाव : प्रतिनिधी

शहरी भागातील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याने बेळगाव दक्षिण आणि उत्तर मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी घटली. घटलेली ही टक्केवारी प्रस्थापितांना साथ देणार की विरोधी उमेदवारांच्या पथ्यावर पडणार आहे, याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे.

दक्षिण मतदारसंघाच्या तुलनेत उत्तर मतदारसंघातील मतदारांनी अधिक प्रमाणात मतदानात सहभाग घेतला. दक्षिण मतदारसंघात 61.57 टक्के मतदान झाले. तर उत्तरमध्ये केवळ 63.18 टक्के इतके मतदान झाले. हा टक्‍का जिल्ह्यातील इतर मतदारसंघाच्या तुलनेत कमी आहे. शहरी भागाचा समावेश असणार्‍या मतदारसंघातच मतदारांनी निरुत्साह दाखविल्याने याचा फटका कोणत्या उमेदवाराला बसणार, याबाबत चर्चा करण्यात येत आहे.

दक्षिण मतदारसंघात म. ए. समिती, भाजप व काँग्रेस अशी तिरंगी लढत होती. याठिकाणी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मतदारांनी अधिक प्रमाणात सहभाग घेतला. यामुळे उत्तरच्या तुलनेत दक्षिणेत अधिक प्रतिसाद लाभला.

म. ए. समितीसमोर भाजपाने जोरदार आव्हान उभे केलेे आहे. म. ए. समितीचे प्रकाश मरगाळे यांनी आजवर केलेल्या कार्याच्या जोरावर प्रचारात मुसंडी मारली होती. मतदारातून त्यांना चांगला प्रतिसाद लाभल्याचे सांगण्यात येत आहे. माजी आ. अभय पाटील यांनीदेखील आपल्याला चांगल्या प्रकारे मतदारांनी साथ दिली असल्याचे सांगितले.

काँग्रेसचे उमेदवार एम. डी.लक्ष्मीनारायण यांनी काँग्रेसची खिंड लढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना विणकर समाज आणि काँग्रेसच्या परंपरागत मतदारावर भरवसा आहे. यामुळे विजयाची दावेदारी करण्यात येत आहे.

म. ए. समितीने जोरदार प्रचार मोहीम राबविली होती. त्याचबरोबर भाजपनेदेखील प्रयत्न केले. काँग्रेसने मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला. यामुळे मतदार कोणाला साथ देणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

उत्तर मतदारसंघात निवडणुकीच्या तोंडावर मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी धार्मिक किनार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याठिकाणी काँग्रेसचे फिरोज सेठ व भाजपचे अ‍ॅड. अनिल बेनके यांच्यामध्ये थेट लढत रंगली आहे.

दोन्ही उमेदवारांचे समर्थक धर्माच्या नावाने विभागण्याचा प्रयत्न झाला. उत्तरमध्ये मतदानाची टक्केवारी घटली आहे. काँग्रेसचे मतदार असणार्‍या भागात नेहमीच मतदारांची गर्दी असते. परंतु, यावेळी असे चित्र अभावाने पाहावयास मिळाले. याउलट मराठी भागात उत्साह जाणवला. शहराच्या मुख्य भागात मतदार मतदानासाठी बाहेर पडल्याचे शनिवारी सायंकाळपर्यंत पाहावयास मिळाले.