Fri, Apr 26, 2019 09:21होमपेज › Belgaon › दोन प्रहरी का गं शिरी सूर्य थांबला

दोन प्रहरी का गं शिरी सूर्य थांबला

Published On: Mar 26 2018 1:18AM | Last Updated: Mar 25 2018 10:19PMबेळगाव : प्रतिनिधी

मध्यान्हाच्या प्रहरी सुवासिनींनी पाळणा हलविला आणि समूहस्वरात पाळणा गात श्रीराम जन्मसोहळा शहर आणि परिसरातील विविध मंदिरात उत्साहात भक्‍तिभावाने रविवारी साजरा झाला.  श्रीरामाचा अखंड नामघोष, गीतरामायणाचे सूर, ढोल—ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि मंगलमय वातावरणात मंदिरांतून श्रीराम मूर्तीला अलंकारासह पेहराव परिधान करण्यात आला. काकडा आरती, अभिषेक, रुद्राभिषेक, सामूहिक रामरक्षा वाचन, भजन, प्रवचन, कीर्तन अशा कार्यक्रमांबरोबरच षोडषोपचार पूजा करण्यात आली. भक्‍तांना सुंठवडा प्रसादाचे वाटप करण्यात आले. उत्सवानिमित्त बहुतांश मंदिरे आकर्षक रोषणाईने व फुलापानांच्या तोरणांनी सजविण्यात आली होती. 

मंदिरांतून दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली. रात्री उशिरापर्यंत दर्शन घेतले. मंदिर परिसरात पूजासाहित्याचे स्टॉल उभारले होेते. पूजासाहित्य घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. 
रामदेवगल्‍ली राममंदिर रामदेेव गल्‍ली येथील राममंदिरात रामनवमी साजरी झाली. धार्मिक कार्यक्रमासह भजनानंतर जन्मोत्सव झाला. पाळणा कार्यक्रमात बहुसंख्य महिला भाविकांनी सहभाग दर्शविला होता. मंदिर कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. एम. कुलकर्णी, सचिव महादेव काळे, ट्रस्टी मोहन चव्हाण यांच्या उपस्थितीत रामनवमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

श्री काणे महाराज मंदिर सद‍्गुरु श्री काणे महाराज व श्री गुरु दरबार सेवा मंडळाच्यावतीने केळकर बाग येथील काणे महाराज मंदिरात नित्य नामस्मरण, अभिषेकानंतर रामजन्मोत्सव झाला. औरंगाबादचे हभप दिलीप वसंत साठे यांचे रसाळ कीर्तन झाले. सायंकाळी दड्डी येथील पंतबाळेकुद्री सांप्रदायिक भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. आज सोमवारी दुपारी 12.30 वा. महाप्रसाद होणार आहे.
गजानन महाराज (शेगांव) श्री गजानन महाराज (शेगांव) भक्‍त परिवार केंद्रातर्फे गजानन महाराज मंदिरात श्रींच्या पादुकांवर अभिषेक, सामूहिक पारायणानंतर जन्मोत्सव सोहळा पार पडला.  

श्रींच्या आरतीनंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी दैनंदिन उपासना, आरती, मंडोळी येथील भजनी मंडळाचे भजन झाले. रात्री शेजारतीने कार्यक्रमाची  सांगता झाली. श्रीराम मंदिर, आचार्य गल्‍ली, गाडेमार्ग, शहापूरतर्फे मिरापूर गल्‍ली, शहापूर येथील पुरातन श्रीराम मंदिरात विविध  कार्यक्रमांसह रामजन्म सोहळा साजरा झाला. बहुसंख्य घरांतूनही श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा रंगला.