Wed, Apr 24, 2019 15:33होमपेज › Belgaon › शिवरायांच्या पहिल्या शिल्पाला अभिवादन

शिवरायांच्या पहिल्या शिल्पाला अभिवादन

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 19 2018 8:32PMबेळगाव  : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील पहिले शिल्प म्हणून ओळखल्या जाणार्‍या यादवाड (जि. धारवाड) येथे बेळगाव परिसरातील शिवप्रेमींनी भेट देऊन अभिवादन केले. त्याठिकाणी ग्रामस्थांसह पहिल्यांदा शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र असणारे जगातले पहिले शिल्प शिवाजी महाराजांच्या हयातीतच बेळडीच्या संस्थानिक मल्लाबाई देसाई यांनी कोरले होते. या शिल्पाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

परंतु, मागील काही दिवसांपासून याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे कोल्हापूर येथील शिवप्रेमींनी काही दिवसापासून भेट देऊन पालकमंत्र्याकडे शिल्पाची निगा राखण्याची विनंती केली होती. ही बातमी वर्तमानपत्रातून वाचून हिंडलगा परिसरातील शिवप्रेमींनी यादवाड येथे सोमवारी धाव घेतली. त्याठिकाणी शिल्पाची पूजा करून अभिवादन केले. यादवाड येथील ग्राम पंचायत कार्यालयाशेजारी असणार्‍या दत्त मंदिरात शिल्प ठेवले आहे.

याची पूजा करण्यात आली. यावेळी परशराम कुडचीकर, मकरंद बागवे, राजू कुप्पेकर, पवन देसाई, महेश देसाई (उचगाव), नागेश चौगुले (मण्णूर), विशाल पाटील आदीसह ग्रामस्थ गंगाधर काशपण्णावर, यल्लाप्पा बंड्याण्णावर, मारुती काशपण्णावर, सिद्धाप्पा ऐनाळ, बसवराज हंपन्नावर उपस्थित होते.
 

शिवाजी महाराज हे मल्लाबाईचे भाऊ

बेळवडी संस्थानच्या  मल्लाबाई देसाई व छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाते बहीण-भावाचे होते. मल्लाबाई देसाई यांच्या पुत्राच्या दहीभाताची सोय व्हावी म्हणून शिवाजी महाराजांनी हे संस्थान महाराजांनी मल्लाबाईला दिल्याचा समज स्थानिक नागरिकांचा आहे.