Thu, Apr 25, 2019 03:26होमपेज › Belgaon › शरद पवार सीमावासीयांशी साधणार संवाद

शरद पवार सीमावासीयांशी साधणार संवाद

Published On: Feb 21 2018 1:21AM | Last Updated: Feb 21 2018 1:21AMबेळगाव : प्रतिनिधी

सीमाभागातील मराठी भाषिकांशी संवाद साधण्यासाठी खा. शरद पवार 31 मार्च रोजी बेळगावात येणार असून त्यांची सभा होणार असल्याची माहिती मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत देण्यात आली. ही सभा सीपीएड मैदान अथवा ज्योती महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्याचे नियोजन आहे. मराठा मंदिरात मध्यवर्ती म. ए. समितीची मंगळवारी बैठक झाली. यावेळी उपरोक्‍त माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी होते.

दळवी म्हणाले, सीमाप्रश्‍नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात आहे. यासाठी खा. शरद पवार यांचे मार्गदर्शन होत आहे. बारामती येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेण्यात आली. यावेळी पवार यांनी केवळ सीमाबांधवांशी संवाद साधण्यासाठी 31 मार्च रोजी बेळगाव येथे येणार येऊ असे म्हटले. कार्याध्यक्ष मनोहर किणेकर म्हणाले, 

‘एक सीमावासी, लाख सीमावासी’ या घोषणेनुसार कार्य करणे आवश्यक आहे. सीमालढा देशपातळीवर नेण्यासाठी होणार आहे. प्रकाश मरगाळे म्हणाले, सीमाभागात पुन्हा एकदा मराठी माणसाचा झंझावात निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी शहर म.  ए. समितीच्या कार्यालयात प्रत्येक रविवारी संध्याकाळी 5 वा. आढावा बैठक करण्यात येईल. यासाठी सर्व घटक समितीने कार्यरत राहावे.