Mon, Apr 22, 2019 03:50होमपेज › Belgaon › अडथळ्यांना न जुमानता पवारांची सभा होणारच

अडथळ्यांना न जुमानता पवारांची सभा होणारच

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

म. ए. समितीच्यावतीने मराठी माणसांना एकत्र आणण्यासाठी 31 मार्च रोजी खा. शरद पवार बेळगावात येणार आहेत. याचा धसका काहींनी घेतला असून यामध्ये अडथळे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अडथळ्यांना न जुमानता पवारांची सभा होणारच, असा निर्धार म. ए. समिती नेत्यांनी व्यक्त केला. मराठी भाषिकांनी अफवांना बळी न पडता सभेला यावे, असे आवाहन केले. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. एन. डी. पाटील असतील. सीमालढा पुन्हा गतिमान होण्यासाठी सभेमुळे मदत होणार आहे. प्रत्येक गावात जागृती मोहीम हाती घेण्यात आली असून त्याला व्यापक पाठिंबा मिळत आहे, अशी माहिती देण्यात 
आली.

समितीची बैठक रविवारी ओरिएंटल स्कूलच्या सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी मनोहर किणेकर होते. ते म्हणाले, मराठी माणूस एकवटत आहे. याचा धसका काही जणांनी घेतला आहे. यामुळे आडकाठी आणण्याचे प्रयत्न होत आहेत. जि. पं. सदस्या सरस्वती पाटील म्हणाल्या, सभेसाठी महिलादेखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.  सभेला गालबोट लागू नये, यासाठी शिस्तबद्ध प्रयत्न करू या.
रामचंद्र मोदगेकर म्हणाले, समितीचे नेते निष्ठेने सीमाप्रश्न सुटावा यासाठी झुंज देत आहेत.

मात्र त्यांच्यावर चिखलफेक करण्यात येत आहे. याला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल. विनायक पाटील,  प्रसाद लाड, अ‍ॅड. सुधीर चव्हाण, अ‍ॅड. शाम पाटील, रवी तरळे यांनी मनोगत व्यक्त केले. सरचिटणीस एल. आय. पाटील, सरस्वती पाटील, माधुरी हेगडे, युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक, सचिव मनोहर संताजी, आर. आय. पाटील, एपीएमसी सदस्य आर. के. पाटील, महेश जुवेकर, ता. पं. सदस्य नारायण कदम, आप्पासाहेब कीर्तने,  नारायण नलवडे, नीरा काकतकर, बी. डी. मोहनगेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 
 


  •