होमपेज › Belgaon › गर्दीचे रूपांतर व्हावे शक्‍तीमध्ये

गर्दीचे रूपांतर व्हावे शक्‍तीमध्ये

Published On: Jan 23 2018 1:17AM | Last Updated: Jan 22 2018 9:46PMबेळगाव : प्रतिनिधी

सावगाव महिला मेळाव्याला अपेक्षेहून अधिक प्रतिसाद लाभला. यातून म. ए. समितीचा उत्साह दुणावला आहे. मेळाव्यातून मराठी संवर्धनाबरोबर महिला सक्षमीकरणाची वेगळी वाट चोखाळण्याचा संदेश देण्यात आला. या गर्दीचे रूपांतर शक्तीमध्ये करण्याची जबाबदारी आगामी काळात संयोजकांना बजावावी लागणार  आहे. समिती चळवळ चालवणारी संघटना आहे. मराठीच्यरा चळवळीत महिलांना सक्रिय करण्याचा प्रयत्न काही वषार्ंपासून समितीकडून सुरू आहेत. त्यांच्याकडून महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या माध्यमातून महिलांचे प्रबोधन केले 
जाते.

यावर्षी पहिल्यांदाच सावगाव येथील महिलांनी पुढाकार घेऊन मेळावा घेतला.  सभामंडप भरल्यामुळे अनेक महिलांना झाडाच्या सावलीत थांबून कार्यक्रमात सहभागी व्हावे लागले.
कार्यक्रमासाठी आठवडाभर तयारी सुरू होती. यासाठी महिलांनीच पुढाकार घेतला. त्यांनीच जागृती केली. यामुळे त्यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद  ठरतात. मेळाव्याला कोल्हापूर येथील भागीरथी महिला मंडळाच्या प्रमुख अरुंधती महाडिक यांनी उपस्थिती दर्शविली. त्यांनी सीमालढ्याबरोबर महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचे आवाहन केले. यामध्ये महिला बचतगट महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांची संख्या वाढविण्याबरोबर महिलांना सक्रिय करावे.  

यातून आत्मविश्‍वास वाढतो. महिलांनी आरोग्यावर गुंतवणूक करावी. त्यावर तुमचे आयुष्य अवलंबून असल्याचे सांगितले. येत्या काळात भागीरथी संस्थेच्यावतीने बेळगावात प्रशिक्षण कार्यक्रम घेणार असल्याचे त्या  म्हणाल्या. प्रा. गीता मुरकुटे यांनी महिलांना स्वाभिमानाबरोबर स्त्रीत्व जपण्याचे आवाहन केले. महिलांनी केवळ चूल, मूल आणि घर म्हणजे संसार नव्हे, याची जाणीव ठेवावी. 
 महिलांचे भावविश्‍व आणि कर्तृत्व विस्तारणे अत्यावश्यक आहे. पुस्तकाशी मैत्री करा. त्यातून विचाराची बैठक पक्‍की होते. महिलांकडून मुलांवर होणार्‍या संस्कारातून त्यांची जडणघडण होते. यामुळे मातृभाषेचे प्रेम मुलांमध्ये लहानपणीच बिंबवणे गरजेचे आहे. यातूनच सीमालढा पुढे जाईल. ‘श्यामची आई’ पुस्तकातून संस्काराचे बळ मिळत असून अशा आई घरोघरी तयारी होण्याची अपेक्षा व्यक्‍त 
केली.