Mon, Jun 17, 2019 04:16होमपेज › Belgaon › सदाशिवनगर स्मशानभूमी स्मार्ट कधी? 

सदाशिवनगर स्मशानभूमी स्मार्ट कधी? 

Published On: Apr 07 2018 1:40AM | Last Updated: Apr 06 2018 9:28PMबेळगाव : प्रतिनिधी 

सदाशिवनगर स्मशानभूमी समस्यांच्या गर्तेत सापडली आहे. शहर, उपनगरातील निम्म्याहून जास्त भागातील मृतदेहांवर येथे अंत्यसंस्कार केले जातात. पण स्मशानभूमीच्या देखभालण दुरुस्तीकडे महापालिका दुर्लक्ष का करते, असा संतप्त सवाल शहरवासीयांतून विचारला जात आहे. स्मार्टसिटी अंतर्गत रस्ते, गटारी चकाचक होताना स्मशानभूमीकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरवासीयांच्या भावना दुखावल्याचा प्रकार आहे.

शेकडो वर्षांची परंपरा वैकुंठधामला आहे. अनेक थोर मोठ्यांच्या अंतिम प्रवासाचा साक्षीदार आहे. येथे वर्षाकाठी 3 हजारावर अंत्यसंस्कार होत असतात. सध्या विविध समस्यांनी स्मशानभूमी ग्रासली आहे. स्मशानभूमीसमोरील कंपाऊंडला तडे गेले आहेत. भिंत केव्हा अंगावर पडेल, हे सांगता येत नाही.  मागील बाजूची भिंत कोसळून वर्ष उलटले तरी अद्याप दुर्लक्षच आहे. 

कुत्र्यांचा वावर ..... भावनेशी खेळ 

साधारण 15 फूट लांब भिंतीला भगदाड पडल्याने दहा ते बारा कुत्र्यांचा कळप रात्री, अपरात्री घुसतो. कुत्र्यांकडून मृत बालकांना दफन केलेले खड्डे उकरण्याचे प्रकार घडत होते. मृतदेहांची ही विटंबनाच आहे. याबाबत महापालिकेने तातडीने पाऊल उचलावे, व कुत्र्यांचा बंदोबस्त करून आवश्यक दु़रुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

मोकळ्या जागेत वृक्षारोपण हवे 

स्मशानभूमीचा परिसर सुमारे दोन एकरहून अधिक आहे. सध्याची स्मशानशेड काही वेळेला अपुरी पडते. प्रसंगी उघड्यावर अंत्यसंस्कार  उरकावे लागतात. नव्याने शेड उभारून उर्वरित जागेत वृक्षारोपण करण्यात यावे. 

कोल्हापूर मनपाचा आदर्श घेणार का? 

कोल्हापूर महानगरपालिका शहर उपनगरातील प्रत्येक मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी मोफत शेणी पुरवठा करते. लाकडाच्या वापराऐवजी शेणी देऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश देते. याच धर्तीवर बेळगाव मनपाने शेणी पुरवठा करून वृक्षतोड रोखण्यास पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. 

शेणींचा वापर केला तर... 

एका मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी शेणींचा वापर केला तर 1200 ते 1400 रु. पर्यंतचा खर्च येतो.  लाकडाचा वापर केल्यास हाच खर्च 5 हजारहून अधिक येतो. यामुळे प्रबोधनासह शेणी पुरविण्यासाठी मनपाने पुढाकार घ्यावा. 

मुक्तिधामच्या धर्तीवर सुधारणा हव्यात

शहापूर मुक्तिधाममध्ये लोकसहभागातून अनेक सुधारणा झाल्या आहेत. स्मशानभूमी प्रशस्त केली आहे. काही शालेय विद्यार्थी अभ्यासाला येतात. याच धर्तीवर सदाशिवनगर स्मशानभूमीमध्ये सुधारणा करण्यासाठी मनपाने पाऊल उचलावे. 

व्याप्तीत 25 उपनगरांचा समावेश 

सदाशिवनगर, विजयनगर, गणेशपूर, कोनवाळ गल्ली, रामलिंग खिंड, पाटील गल्ली, शाहूनगर, आझमनगर, नेहरूनगर, सह्याद्रीनगर, फुलबाग गल्ली, गँगवाडी, महांतेशनगर यासह अन्य उपनगरांचा सदाशिवनगर स्मशानभूमीच्या व्याप्‍तीत समावेश होतो. 
 

 

 

tags ; Belgaum,news, Sadasivanagara, Graveyard, problem, Belgaum, municipal, neglect,