होमपेज › Belgaon › दहावी निकाल वाढीसाठी ‘उत्तीर्ण टक्केवारी’ उपक्रम

दहावी निकाल वाढीसाठी ‘उत्तीर्ण टक्केवारी’ उपक्रम

Published On: Jan 04 2018 1:00AM | Last Updated: Jan 03 2018 9:33PM

बुकमार्क करा
बेळगाव ः महेश पाटील

आगामी दहावी परीक्षेचा निकाल वाढविण्यासाठी बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात विशेष उपक्रम हाती घेण्यात आला असून या उपक्रमांतर्गत कोणत्याही परिस्थितीत बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा शंभर टक्के निकाल लावण्यासाठी दहावी उत्तीर्ण टक्केवारी अर्थात (पासिंग पर्सेंटेज) हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेला सामोरे जाण्यासाठी धैर्य आणि मानसिक क्षमतेमध्ये वाढ करण्याकरिता प्राधान्य देण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यापासून या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला असून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात येणार्‍या सात तालुक्यात यासाठी दैनंदिन कार्यक्रम आयोजित करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना विविध विषयांबाबत मार्गदर्शन देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमधील परीक्षेबाबतची भीती दूर करणे हा प्रमख उद्देश समोर ठेवण्यात आला असून उत्तरपत्रिका सोडविताना सर्वप्रथम सुलभ उत्तरे सोडवून किमान प्रत्येक विषयात पन्नास टक्के गुण मिळविण्याचे उद्दिष्ठ समोर ठेवण्यात आले आहे. 

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सात तालुक्यातील 468 माध्यमिक शाळांतील 31061 विद्यार्थ्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक विषयात किमान 50 टक्के गुण मिळविले तरी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा निकाल शंभर टक्के इतका लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयातून प्रयत्न सुरु आहेत. हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयातील कार्यकारी अधिकारी  एम. आर. अलासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  या उपक्रमांतर्गत बैलहोंगल तालुक्यातील 65 शाळांमधील 13 केंद्रांमध्ये 3805, खानापूर तालुक्यातील 55 शाळांमधील 14 केंद्रांमध्ये 3762, बेळगाव शहरातील 112 शाळांमधील 25 केंद्रांमधील 8656, बेळगाव ग्रामीण मधील 98 शाळांतील 19 केंद्रांमधील 5408, सौदत्ती तालुक्यातील 64 शाळांमधील 15 केंद्रातील 4336, रामदुर्ग तालुक्यातील 48 शाळांतील 11 केंद्रातील 3327 आणि कित्तूर तालुक्यातील 26 शाळांतील 7 केंद्रांमधील 1767 विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत दैनंदिन मार्गदर्शन केले जात आहे.

विशेष म्हणजे या एकूण 7 शैक्षणिक तालुक्यातील 68 बाह्य आणि 36 अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रमही राबविण्यात आला आहे. या उपक्रमाला विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकाकडूनही प्रतिसाद मिळत आहे. यामुळे आगामी दहावी परीक्षेत बेळगाव शैक्षणिक जिल्हा प्रथम क्रमांकावर येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. याकरिता जिल्हा शिक्षणाधिकारी ए.  बी. पुंडलिक तसेच सर्व 7 शैक्षणिक तालुक्यातील गटशिक्षणाधिकारीही कार्यरत झाले आहेत.