Mon, Mar 25, 2019 13:35होमपेज › Belgaon › दहावी परीक्षेपासून 1050 विद्यार्थी वंचित ?

दहावी परीक्षेपासून 1050 विद्यार्थी वंचित ?

Published On: Mar 18 2018 11:39PM | Last Updated: Mar 18 2018 11:17PMबेळगाव : प्रतिनिधी

दहावीच्या वार्षिक परीक्षेला बसण्यासाठी किमान 75 टक्के विद्यार्थ्याची हजेरी असणे बंधनकारक आहे. या निकषामुळे बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील 1050 विद्यार्थी वार्षिक परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्हा पंचायत कार्यालयात शनिवारी जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन यांच्या उपस्थितीत दहावी वार्षिक परीक्षेबाबत पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांना अनियमित विद्यार्थ्यांचा मुद्दा उपस्थित करून अधिकार्‍यांना धारेवर धरले.राज्यात 23 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत.  याबाबत अधिकार्‍यांनी आढावा घेतला. 

जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला म्हणाले, जिल्ह्यात अनियमित विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. यासाठी अधिकार्‍यांनी खबरदारी घेणे अत्यावश्यक होते. गैरहजर विद्यार्थ्यांच्या पालकांना याबाबत माहिती देणे गरजेचे होते. केवळ शाळेचा निकाल चांगला लागण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवणे योग्य नव्हे. जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन म्हणाले, मुलांचे भवितव्य शिक्षकांच्या हातात असते. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्याकडे लक्ष देणे आवश्यक असते.

दहावी परीक्षेसाठी चिकोडी आणि बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात एकूण 228 परीक्षा केंद्रे आहेत. चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातून 32072 तर बेळगावमधून 49423 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरा बंधनकारक करण्यात आला आहे. प्रश्नपत्रिकेची ने-आण करण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. राचमंद्रन यांनी दिली. यावेळी  शिक्षणधिकार्‍याबरोबर पोलिस अधिकारीही उपस्थित  होते.