Thu, May 23, 2019 15:34
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › ग्रामीण मतदारसंघात राजकारण गतिमान

ग्रामीण मतदारसंघात राजकारण गतिमान

Published On: Jan 24 2018 1:23AM | Last Updated: Jan 23 2018 8:15PMबेळगाव : प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ग्रामीण मतदारसंघातील राजकीय वातावरण गतिमान झाले आहे. निवडणूक अद्याप जाहीर झाल्या नसल्यातरी इच्छुक सक्रिय झाले आहेत. त्यांनीं जेवणावळी, विकासकामे, मेळावे, वाढदिवस यामाध्यमातून संपर्काला सुुरुवात केली आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून भाजपने वर्चस्व ठेवले आहे. याठिकाणी सलग दोनवेळा भाजपाने यश मिळविले असून म. ए. समिती व काँग्रेस विजय मिळविण्यासाठी धडपडत आहे. समितीला बेकीचा फटका बसला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत समितीच्या हातातोंडाला आलेला विजयाचा घास थोड्या मतांनी हिरावून घेतला . त्याचबरोबर काँग्रेसलाही बंडखोर उमेदवाराचा फटका सहन करावा लागला.

येत्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत विजयश्री खेचून आणण्याचा चंग म. ए. समिती व काँग्रेसने बांधला आहे. काँग्रेस पक्षाच्या राज्य महिला अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सतत पराभवाला सामोरे जाऊनदेखील संघटनेचे काम सुरूच ठेवले आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक मे महिन्याच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाची तयारी सुरू आहे. निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. यासाठी कार्यक्रमांना ऊत आला आहे. यामध्ये काँग्रेस सध्या आघाडीवर आहे.

हेब्बाळकर यांनी दोनवेळा विधानसभा तर लोकसभा निवडणुकीत एकदा पराभव पत्करला आहे. तरीदेखील त्यांनी आपले काम सुरूच ठेवले आहे. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत विजय खेचून आणण्याचा चंग बांधला आहे.  त्यांनी सोनोली येथे 12 जानेवारी रोजी पश्‍चिम भागातील मराठी कार्यकर्त्यांचा मेळावा तर 21 रोजी बागेवाडी येथे मंत्र्यांच्या उपस्थितीत विकासकामांचा शुभारंभ करून शक्तीप्रदर्शन केले. भाजपाने हा मतदारसंघ मागील दहा वर्षापासून आपल्याकडे राखला आहे. त्यातच शिवाजी सुंठकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांचे कार्यकर्ते अद्याप भाजपात गेले नसले तरी ते त्यांच्यासोबतच आहेत. यामुळे भाजपने बेरजेचे गणित केले आहे. आ. संजय पाटील यांनी वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना एकत्र करून कामाला लागण्याचे आवाहन केले आहे.

तालुका म. ए. समितीदेखील सक्रिय झाली असून युवा आणि महिला मेळाव्यातून कार्यकर्त्यांना सक्रिय केले आहे. समितीमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सध्या संघटना बळकट करण्याला प्राधान्य देण्यात आले असून इच्छुकांनी वैयक्तिक गाठीभेटीवरच भर दिला आहे.  निवडणुकीच्या तोंडावर अपक्षांच्या आशाआकांक्षांनादेखील धुमारे फुटले आहेत. काहीजणांनी जेवणावळी, देणग्या यामाध्यमातून आपली प्रतिमा उजळ करण्याचा प्रयत्न चालविला आहे. यामुळे ग्रामीणचे राजकीय वातावरण गतिमान झाले आहे.