Thu, Nov 15, 2018 03:40होमपेज › Belgaon › रस्त्यांवर लावण्यात येणार्‍या वाहनांवर कारवाई

रस्त्यांवर लावण्यात येणार्‍या वाहनांवर कारवाई

Published On: Jan 23 2018 1:17AM | Last Updated: Jan 22 2018 9:33PMबेळगाव : प्रतिनिधी

वाढते अपघात आणि यामध्ये दुचाकी चालकांचे बळी याकडे लक्ष देऊन हेल्मेटसक्‍ती अमंलबजावणी सुरू झाली आहे. रहदारीचे नियम पाळण्याबाबत विविध प्रकारे जनजागृती उपक्रम हाती घेतले जाणार आहे. त्याचबरोबर कॉलेज आणि हॉस्पिटलसमोर होणार्‍या वाहनांच्या गर्दीला आळा घालण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्‍त डॉ. डी. सी. राजप्पा यांनी दिली. शहरातील शक्‍ती पोलिस व्यवस्थेबाबत बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी पोलिस आयुक्‍तांवर महाविद्यालय आणि रूग्णालयांसमोर होणारी वाहनांची गर्दी तसेच रिक्षा मीटरसक्‍तीसंदर्भात प्रश्‍नाची सरबत्ती केली. यावेळी  राजप्पा म्हणाले, आयुक्‍तपदाची सूत्रे हाती घेऊन अद्याप महिनाही झालेला नाही.

शहरातील गुन्हेगारी आणि रहदारीसंदर्भात अधिकार्‍यांसोबत सातत्याने बैठका घेतल्या जात आहेत. महाविद्यालय आणि रूग्णालयांसमोरील रस्त्यांवर होणारी वाहनांची गर्दी आणि त्यातून निर्माण होणारी रहदारीची समस्या याबाबत संबंधित व्यवस्थापन मंडळाशी चर्चा केली जाईल. विद्यार्थ्यांची वाहने कॉलेज कॅम्पस परिसरात लावण्यात यावीत, अशी सूचना करण्यात येईल. सूचनेची अंमलबजावणी होत नसल्यास कॉलेज आणि रूग्णालयांसमोरील रस्त्यांवर लावण्यात येणार्‍या वाहनांवर कारवाई  केली जाईल. शहरातील रिक्षा व्यवस्थेबाबत माहिती घेऊन रिक्षाचालकांनी मीटरप्रमाणे भाडे आकारावे, यासाठी  जिल्हाधिकार्‍यांसोबत चर्चा केली जाईल. शहरातील रिक्षा चालकांना प्रवाशांकडून मीटरप्रमाणे योग्य त्या प्रकारे भाडे आकारावे, अशी सूचनाही लवकरच करण्यात येणार असल्याचे राजप्पा यांनी सांगितले. 

  ...अन् आयुक्‍त वैतागले 

पत्रकार परिषदेला उपस्थित पत्रकारांनी हेल्मेट सक्‍ती आणि रिक्षाचे मीटरप्रमाणे भाडे यासंदर्भात यापूर्वीही अंमलबजावणी करण्यात आली होती. मात्र पोलिसांची कारवाई केवळ निमित्त मात्र ठरते. आपण हाती घेतलेली कारवाई किती दिवस चालणार, असे प्रश्‍न उपस्थित केले. यावेळी पत्रकारांच्या प्रश्‍नांच्या भडीमाराने पोलिस आयुक्‍त राजप्पा वैतागले. मागील काळात झालेल्या कामांची मला माहिती नाही. मी जे काही करतो, तेवढेच तुम्हाला सांगेन, असे सांगून त्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.