Thu, Jul 18, 2019 02:04होमपेज › Belgaon › बेळगावच्या निकालाची कोल्हापूरकरांत उत्सुकता

बेळगावच्या निकालाची कोल्हापूरकरांत उत्सुकता

Published On: May 14 2018 1:42AM | Last Updated: May 14 2018 12:00AMबेळगाव : प्रतिनिधी 

17 व्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शनिवारी झालेल्या मतदानाने संपली आहे. बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघातील प्रचारात कोल्हापूर जिल्ह्यातील आजी-माजी मंत्री, खासदार, कार्यकर्ते व नातेवाईकांनीही मोठी रंगत आणली. त्यांच्याकडून झालेल्या प्रयत्नांची फलनिष्पत्ती काय होणार, हे आता मंगळवारी दि. 15 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत जाहीर होणार्‍या निकालातून स्पष्ट होईल.

कोल्हापूरकरांचे बेळगावकरांशी जीवाभावाचे नाते असल्याने त्यांनाही निकालाची हुरहूर लागून आहे. बेळगाव ग्रामीण मतदार संघ आणि महाराष्ट्रातील शेवटचा चंदगड विधानसभा मतदार संघ यांच्यात जसे ऋणानुबंधाचे नाते आहे तसेच नाते निपाणी विधानसभा मतदार संघ व कागल आणि करवीर (कोल्हापूर) विधानसभा मतदार संघ यांच्यात आहेत. जसे पै -पाहुण्यांचे संबंध आहेत तसे राजकीयही संबंध आहेत. त्यामुळे सीमाभागातील प्रत्येक लहान मोठ्या घटनांचे पडसाद कोल्हापुरात उमटतात. बेळगाव जिल्ह्यातील 15 हजार बांधकाम कामगारांना रोजगार देणारे ठिकाणही कोल्हापूरच आहे. सीमाप्रश्‍नामध्ये कोल्हापूरने नेहमीच आक्रमक व लढाऊ बाण्याची भूमिका घेतली आहे. 

अनेक राष्ट्रीय पक्षांनी आपल्या ध्येय धोरणानुसार कोल्हापुरातल्या नेत्यांवर जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून आणता येतील, याची व्यूहरचना सोपविण्यात आली होती. 

महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री व विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांची राजकारणातील घट्ट पकड पहाता राष्ट्रीय काँग्रेसने त्यांच्यावर सीमाभागातील आठ विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या विजयाची धुरा सोपविली होती. यामुळे त्यांनीही झोकून देवून काम केले आहे. कोल्हापुरातील भाजपचे पदाधिकारी व पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यावर सीमाभागातील मतदार संघांची जबाबदारी दिली होती. त्यांच्या नेतृत्त्वाखाली एक पथक महिनाभर तळ ठोकून कार्यरत होते. 

कोल्हापुरातील शेतकरी कामगार पक्षाने जाहीर सभा घेवून मध्यवर्ती म. ए. समितीच्या उमेदवारांना पाठिंबा देवून त्यांचा प्रचारही केला होता. राष्ट्रवादीचे नेते व कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने तसेच व्याख्याते प्रा. मधुकर पाटील यांनीही सीमाबांधवामध्ये उर्जा निर्माण केली आहे. या सार्‍यांचे लक्ष मंगळवारी जाहीर होणार्‍या निकालाकडे लागून आहे. 

मध्यवर्तीचा पहिला उमेदवार कोल्हापुरातून 

सीमा बांधवांच्या लढ्याचे उर्जास्थान म्हणून कोल्हापुरला ओळखले जाते. सीमाभागाचे अग्रणी नेते माजी मंत्री प्रा. एन. डी. पाटील यांच्या कोल्हापूर येथील कार्यालयात विधानसभा निवडणुकीसाठी मध्यवर्ती म. ए. समितीचा पहिला उमेदवार घोषित केला आहे. त्यामुळे कोल्हापुरकर आणि सीमाबांधव बेळगावकर यांच्यात एक वेगळा ऋणानुंबध असल्याचे स्पष्ट होत आहे.