Thu, Aug 22, 2019 11:04होमपेज › Belgaon › अवीट गीतांनी रंगली ‘स्वरसंध्या’

अवीट गीतांनी रंगली ‘स्वरसंध्या’

Published On: Jan 24 2018 1:22AM | Last Updated: Jan 23 2018 11:45PMबेळगाव : प्रतिनिधी  

अवीट स्वरातून सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस अशा मराठी-हिंदी गीतांनी स्वरसंध्या रंगली. स्वरांच्या बहारदार सादरीकरणाने रसिक चिंब झाले. यामुळे मंगळवारची सायंकाळ रसिकांना यादगार ठरली. मर्कटाईल को-ऑप. सोसायटी आणि मर्कंटाईल सेवा केंद्राच्यावतीने मंगळवारी भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालयात ‘सुरांच्या चैत्रबनात’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात मर्कंटाईल सोसायटीचे चेअरमन संजय मोरे, गायिका सावनी रविंद्र, अभिलाषा चेल्लम, सागर फडके, बिंबा नाडकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. सागर फडके यांनी ‘मोरय्या, मोरय्या’ या गणेशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्याच्या दमदार आवाजाने रसिकांची मने जिंकली. अभिलाषा चेल्लम हिने ‘ही गुलाबी हवा’ हे गाणे सादर करून रसिकांची दाद मिळविली.

सावनी रविंद्र हिने ‘गोर्‍या, गोर्‍या’  या बहारदार गाण्याने रसिकांना डोलायला लावले. त्यानंतर सागर व अभिलाषा यांनी ‘प्रेम ऋतु’ हे युगलगीत सादर केले. सावनी  हिने यावेळी नाही कळले, मै तैनु समझावा, बुगडी माझी सांंडली, ही गीते सादर केली.सागर फडकेके देवा तुझ्या गाभार्‍याला, खेळ मांडला, साजिरी गोजिरी, ललाटी भंडार, माउली ही गाणी तर अभिलाषा यांनी अप्सरा आली, वाजले की बारा, दमा दम मस्त, झिंगाट आदी गाण्यांचे सादरीकरण केले. यावेळी की बोर्डवर राहुल सिंग व प्रशांत, गिटार सूरज कांबळे, र्‍हिदम ओमकार जोशी, ऑक्टोपॅड सचिन जाधव, प्रथमेश जाधव, ढोलकी हणुमंत चौगुले यांनी साथ दिली. ऋचा थते हिने उत्कृष्ट निवेदन केले.

आरती अंकलीकर-टिकेकर यांचे आज गायन 

सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांचे बुधवारी सायं. 6.30 वा. गायनाचा कार्यक्रम होणार आहे. अंकलीकर या ग्वाल्हेर घराण्याचे गायक स्व. पंडीत वसंतराव कुलकर्णी यांच्या शिष्या आहेत. त्यांना आतापर्यंत सवाई गंधर्व महोत्सव पुणे, मल्हार उत्सव दिल्ली, तानसेन समारोह ग्वाल्हेर, दोवर लेन उत्सव कोलकत्ता, शंकरलाल महोत्सव दिल्ली, मद्रास म्युझिक अकादमी चेन्नई यासह देश आणि विदेशाती गायनाचे कार्यक्रम केलेले आहेत.