होमपेज › Belgaon › गल्लीबोळांवर शक्‍ती पोलिसांची नजर

गल्लीबोळांवर शक्‍ती पोलिसांची नजर

Published On: Jan 23 2018 1:16AM | Last Updated: Jan 22 2018 10:26PMबेळगाव : प्रतिनिधी

अलीकडच्या काळात शहरात जातीय तणावाच्या घटना वाढल्या आहेत. समाजकंटकांचा उपद्रव वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्‍तालय विभागातील 14 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत 20 शक्‍ती दुचाकी पोलिस गस्त घालून गल्लीबोळातील गुन्हेगारांवर नजर ठेवणार आहेत. प्रसंगी थेट कारवाई करणार आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्‍त राजप्पा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. सोमवारी पोलिस आयुक्‍तालयात झालेल्या शक्‍ती पोलिस व्यवस्थेला जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला आणि पोलिस आयुक्‍त डॉ. डी. सी. राजप्पा यांनी हिरवा झेंडा दाखविला. 

नव्या पोलिस व्यवस्थेबाबत  राजप्पा म्हणाले, 14 पोलिस ठाणे हद्दीत 20 शक्‍ती दुचाकी सकाळी 9 ते 6 व सायंकाळी 6 ते रात्री 2 पर्यंत सतत गस्त घालणार आहेत. या पोलिसांना काम करणार्‍या विभागातील  संवेदनशील, अतिसंवेदनशील भागात खास पॉईंट नेमून देण्यात आले आहेत. संवेदनशील, अतिसंवेदनशील ठिकाणी अर्धा तास वॉच केल्यानंतर शक्‍ती पोलिस दुचाकीवरून पोलिस ठाणे हद्दीत गस्त घालणार आहेत. नागरिकांच्या संपर्कात राहून समाजकंटक आणि गुन्हेगारांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न शक्‍ती पोलिस करणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास शक्‍ती पोलिस कारवाई करून समाजकंटक अथवा गुन्हेगारांना त्या भागातील पोलिस अधिकार्‍यांकडे सुपूर्द करतील. 

शक्‍ती पोलिसांना खास दुचाकी वाहने देण्यात आली आहेत. त्याचबरोबर कॅमेरा, बॅटरी, वॉकीटॉकी आदी साहित्य देण्यात आले आहे. शक्‍ती पोलिसांना त्यांच्या कामांचे बीट निश्‍चित करून देण्यात आले आहे. शक्‍ती पोलिस गुन्हे विभागाच्या पोलिस उपायुक्‍तांच्या सूचनेनुसार स्वतंत्रपणे काम करणार आहेत. शक्‍ती पोलिसांचे त्या विभागातील पोलिस ठाण्याशी थेट संपर्क राहणार नाही. असेही राजप्पा यांनी स्पष्ट केले.  चन्नम्मा महिला संचारिन जागृती दल  महिलांच्या सुरक्षिततेबाबत ‘चन्नम्मा महिला संचारिन जागृती दल’ महिला पोलिसांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. सदर सेवा बजावणार्‍या महिला पोलिसांना स्वतंत्र वाहन देण्यात आले आहे. चन्नम्मा जागृती पोलिस  दलाच्या  ओळखीसाठी त्या वाहनांना गुलाबी रंग देण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांवर अत्याचार होत असल्यास हे दल तत्काळ जागी पोहोचून कारवाई करणार आहे, असेही राजप्पा यांनी स्पष्ट केले.