Fri, Mar 22, 2019 05:35
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › दंगलीचा अंदाज असूनही गाफिल

दंगलीचा अंदाज असूनही गाफिल

Published On: Dec 21 2017 1:54AM | Last Updated: Dec 21 2017 12:00AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव परिसरात ‘सीमी’ व अन्य काही बंदी घातलेल्या संघटनांचे नेटवर्क कार्यरत आहे. याची पुरेपूर माहिती पोलिस खात्यालाही आहे. तरीही बेळगावचे पोलिस दंगलींना आवर घालण्यात अपयशी ठरले आहेत. रविवारी हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या मोर्चानंतर  त्याची प्रतिक्रिया  येण्याची शक्यता होतीच. तरीही दंगल घडली हे जास्त घातक आहे. यामुळे पोलिसांना अंदाज असूनही ते गाफिल राहिले का? हा प्रश्‍न आहे. 

खडक गल्ली परिसरात घडलेल्या दंगलीत पेट्रोलबॉम्बचा वापर  झाल्याने  पुढील काळात दंगलखोरांच्या कारवायांचा धोका वाढला आहे. 15 वर्षापूर्वी बेळगाव परिसरात दहशतवादी संघटनांचे जाळे कार्यरत असल्याचे उघडकीस आले होते. रामदुर्ग तालुक्यात सीमीच्या स्लिपरसेलचा पर्दाफाशही झाला होता. शहरापासून काही अंतरावर असलेल्या शिंदोळी गावात सीमी कार्यकत्यांर्ंचा वावर होता. त्यातच हैद्राबाद बॉम्बस्फोटानंतर यासिन भटकळने बेळगावात काहीकाळ वास्तव्य केल्याचाही संशय व्यक्त केला जात होता. 

2008 सालच्या गुजरात  येथील बॉम्बस्फोटप्रकरणी बेळगावातील भडकल गल्ली येथील नसीर रंगरेज याला दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले होते. रंगरेज हा शस्त्राचे प्रशिक्षण देण्याबरोबर मुस्लीमविरोधी दंगलीचे व्हिडिओ दाखवून बेळगावातील तरुणांना चिथावणी देत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. तीन राज्यांच्या सीमेवर वसलेले बेळगाव संशयित दहशदवाद्यांसाठी सुरक्षित शहर ठरत असल्याचा संशय राष्ट्रीय सुरक्षा विभागाने व्यक्त केला होता. 

2012 साली पिरनवाडीतील एका कथित प्रार्थनास्थळाच्या तंबुवरून   तणाव निर्माण झाला. त्या तणावाचे लोण शहरात पसरले. वडगाव आणि भाजीमार्केट नजीक दोघांचे खून झाले. त्या जातीय तणावाला खतपाणी घालण्याचे काम राजकारण्यांनी केले. याची माहितीही पोलिसांना मिळाली.  

2014 साली अनगोळात गांजाविक्री प्रकरणातून एकाचा खून झाला. त्या घटनेला जातीय स्वरुप देण्यात आले. तरुणाच्या खूनप्रकरणी एका गटाने हिंसक आंदोलन केले. माहिती पोलिसांनाही होती. 

2015 साली क्रिकेटच्या क्षुल्लक वादातून गांधीनगरात तणाव निर्माण झाला. वैयक्तीक वादाला जातीय स्वरुप देण्यात आले. यावेळीही दंगलखोरांनी नियोजनबद्धरित्या दंगल पेटविण्याचे काम केले. 15 वाहने जाळण्यात आली. पोलिसांची जीप पेटविण्यात आली. एक पोलिस उपनिरीक्षकांसह 6 हवालदार जखमी झाले. 

बेळगाव परिसरात आजवर झालेल्या दंगली आणि जातीय तणावाच्या कारणांची पोलिस खात्याला चांगलीच माहिती आहे. गेल्या दीड महिन्यात खडकगल्ली परिसरात वारंवार जातीय तणाव निर्माण होत आहे. या भागातील दंगलखोरांना शोधण्यात पोलिस यंत्रणा कुचकामी ठरली आहे. 

गुप्‍तचर विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह

बेळगाव : प्रतिनिधी

दंगलखोरांच्या कारवायांना दहशतवादी स्वरुप मिळत असल्याचे दिसून येत आहे. धर्माच्या नावावर तरुणांना चिथावणी देत बेळगावात सातत्याने नियोजनबद्धरित्या दंगली घडविण्याचे काम सुरू आहे. अशावेळी बेळगावच्या गुप्तचर पोलिसांच्या कामगिरीवर संशय व्यक्त होत आहे. 

काश्मिरात दहशतवाद्यांना सहकार्य करणार्‍यांचे कारनामे प्रसारमाध्यमांमधून नेहमीच पुढे येत असतात. तोंडाला रुमाल बांधून पोलिसांच्या अंगावर चाल करणारे तरुण काश्मिरात पहावयास मिळतात. चेहराला  रुमाल बांधल्यामुळे पोलिसांपासून ओळख लपविता येते. थेट पोलिसांसमोर जावून त्यांच्यावर हल्ला करता येतो. याची जाणीव झाल्यानंतर दहशतवाद्यांच्या चिथावणीला बळी पडलेले काश्मिरी तरुण पोलिस आणि भारतीय जवानांविरोधात संघर्ष करताना दिसतात. भारतीय सेनेविरोधातील संघर्षात ते तरुण पेट्रोल बॉम्बचाही वापर करतात. या डावपेचांची पुनरावृत्ती बेळगावात होताना दिसत आहे. सोमवारी रात्री खडकगल्ली व आसपासच्या संवेदनशील परिसरात झालेल्या दंगलीत दंगलखोरांनी वाहन आणि घरांना आगी लावल्या.  बिअरच्या बाटलीत पेट्रोल घालून त्या घरे इमारती आणि वाहनांवर फेकण्यात आले. 

गेल्या काही वर्षापासून बेळगाव परिसरात दहशतवादी कारवायांशी सलग्नीत असलेल्या स्लिपरसेलचे काम नियोजनबद्धरित्या सुरू असल्याचा संशय आहे. गरीब आणि बेरोजगार तरुणांना धर्माच्या नावाखाली चिथावणी देत दंगलीसाठी प्रोत्साहीत करण्याचे कामसुरू असल्याचा संशय आहे.

बेळगावात दंगलखोरांनी आक्रमक आणि  धोकादायक पवित्रा घेतला असताना पोलिस खात्याची गुप्तचर यंत्रणा नक्की कोणत्या गुन्हेगारांचा शोधात असत हा प्रश्‍न आहे. शहर परिसरात होत असलेल्या गुन्हेगारी घटनांचा मागोवा घेत गुन्हेगारांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवणे त्यांच्या काळ्या कारनाम्याची माहिती गोळा करून वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना देणे हे काम  गुप्तचर विभागाला करावे लागते. मात्र वारंवार दंगली घडत असतानाही गुप्तचर विभागाला दंगलखोरांचा मागोवा का घेता येत नाही? असा प्रश्‍न असून गुप्‍तचर विभागातील कार्यक्षमताच संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे.