Wed, Sep 26, 2018 08:38होमपेज › Belgaon › कर्नाटकात राजकीय भूकंप? बेळगावचा वाद सरकार अडचणीत

बेळगावच्या वादात कर्नाटक सरकारची कसोटी

Published On: Sep 06 2018 1:40AM | Last Updated: Sep 06 2018 1:38PMबंगळूर, बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव पीएलडी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीवरून  जारकीहोळी बंधू आणि आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात निर्माण झालेल्या संघर्षातून राज्यातील युती सरकारच पणाला लागले आहे. ऐनवेळी भाजपनेही या वादात उडी घेतली असून, बेळगावातील वाद बंगळुरपर्यंत पोचणारच असे वक्‍तव्य माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी केले आहे. परिणामी, काँग्रेसने तातडीने हालचाली न केल्यास राजकीय उलथापालथ होण्याचा अंदाज राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत.

वीस वर्षांपासून बेळगाव पीएलडी बँकेवर जारकीहोळी बंधूंचे वर्चस्व होते. आता आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांचे वर्चस्व निर्माण होणार असल्याने त्यांच्यासाठी हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. या सत्तासंघर्षावरून सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी जारकीहोळी बंधू करत आहेत. दोन दिवसांपूर्वी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी बारा आमदारांसह पक्षातून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. पीएलडीच्या सत्तासंघर्षामुळे आता सरकार अडचणीत येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

दरम्यान, भाजपकडून पुन्हा एकदा ऑपरेशन कमळ राबविण्याचा प्रयत्न होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा जारकीहोळी बंधूंना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास सरकारला धोका पोचणार आहे.

प्रदेश काँग्रेसने माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर बेळगावातील वाद सोडविण्याची जबाबदारी सोपविली आहे. पण, सध्या ते काही आमदारांसोबत युरोप दौर्‍यावर गेले आहेत. दहा दिवसांचा दौरा करून ते परतणार आहेत. त्यानंतर या वादावर पडदा पडणार की तो भडकणार, हे पहावे लागणार आहे.