Sun, Jul 21, 2019 00:03होमपेज › Belgaon › हेल्मेटची कुठे सक्‍ती, कुठे मुक्‍ती

हेल्मेटची कुठे सक्‍ती, कुठे मुक्‍ती

Published On: Feb 25 2018 1:15AM | Last Updated: Feb 25 2018 12:05AMबेळगाव : प्रतिनिधी

शहरामध्ये पोलिस खात्याकडून ‘नो हेल्मेट न पेट्रोल’ मोहीम हाती घेण्यात आली. मोहिमेचा तिसरा दिवस असून पोलिस प्रशासनाने आपली भूमिका कायम  ठेवली आहे. अनेक वाहन चालक विनाहेल्मेट प्रवास करीत आहेत. अशा दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तर विनाहेल्मेट पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनचालकांच्या दुचाकीचे फोटो घेऊन नोटीस पाठविण्याच्या प्रक्रिया सुरू आहे.  काही पेट्रोलपंपांवर विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना पेट्रोल देण्यात येत आहे.

पोलिस प्रशासनाने ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ ही मोहीम सुरू केल्याने वाहन चालकांना हेल्मेटविना पेट्रोलपंपांवर पेट्रोल न देण्याची कारवाई सुरूच आहे.  मात्र, यामध्ये पेट्रोल पंप मालकांपुढे  मोठी समस्या झाली आहे. नागरिकांचा विरोध होत असला तरी पोलिस खात्याच्या आदेशाने कारवाई करण्यात येत असल्याचे पेट्रोल पंपांच्या मालकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे वाहन चालकांचाही नाईलाज झाला आहे.  नागरिकांना आवाहन करूनही याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

त्यामुळे पेट्रोलपंप चालक वाहन चालकांच्या भूमिकेमुळे हवालदिल झाले आहेत. वारंवार होणार्‍या वादावादीच्या घटना आणि वाहनचालकांकडून तोडले जाणारे नियम यामुळे पेट्रोल पंपचालकही हताश झाले आहेत. काही पेट्रोलपंपांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने वादावादीचे प्रसंग होताना दिसत नाहीत. मात्र, काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. तसेच मदतीला पोलिसही नसल्याने सर्रासपणे सर्व वाहनचालकांना पेट्रोल देण्यात येत आहेत. यामुळे पोलिसांच्या मोहिमेला 100 टक्के यश मिळेल हे सांगता येणे कठीण आहे. पोलिस अधिकार्‍यांकडून या मोहिमेला यश मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याचे चित्र आहे.