होमपेज › Belgaon › मनपाचे कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

मनपाचे कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

Published On: Feb 21 2018 1:21AM | Last Updated: Feb 21 2018 12:10AMबेळगाव : प्रतिनिधी

मालमत्ता कर भरण्यासाठी चलन मागणार्‍या मालमत्ताधारकाला चलन देण्यासाठी 3 हजार रुपयांची लाच मागणार्‍या मनपाच्या महसूल विभागातील दोघा कर्मचार्‍यांना एसीबी पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ अटक केली. महसूल अधिकारी महावीर अरिहंत यळगुद्री, अटेंडर विनायक मनोहर मेणसे अशी त्यांची नावे आहेत. महसूल विभागाच्या गैरकारभारावरून  महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत नेहमीच वादळी चर्चा केली जाते. मात्र अधिकार्‍यांच्या गैरकारभारामुळे मनपाचामहसूल बुडत असल्याचे या प्रकरणातून पुढे आले आहे. 

मालमत्ता कर भरण्यासाठी आवश्यक असणारे चलन देण्यात यावे यासाठी अविनाश डी. नामक व्यक्तीने महसूल चलन मागितले. त्यासाठी अर्जही केला होता. मात्र सदर अधिकार्‍यांकडून चलन देण्यास टाळाटाळ केली जात होती. शेवटी अविनाश यांच्याकडे त्यांनी 3 हजारची मागणी केली होती.  त्यानंतर  अविनाश यांनी एसीबी पोलिसांकडे धाव घेतली होती. 

एसीबी पोलिसांनी सापळा रचून लाच घेताना मनपाच्या कर्मचार्‍यांना रंगेहाथ पकडले आहे. यामुळे मनपामध्ये एकच गोंधळ उडाला आहे. यापूर्वीही महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर तरी महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांमध्ये सुधारणा होईल का? हे पहावे लागणार आहे. एसीबीचे डीएसपी रघू यांच्या नेतृत्वामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.