होमपेज › Belgaon › शिवसृष्टी कामाबाबत महापालिकेला जाग

शिवसृष्टी कामाबाबत महापालिकेला जाग

Published On: Jan 23 2018 1:17AM | Last Updated: Jan 22 2018 9:43PMबेळगाव : प्रतिनिधी      

शिवसृष्टी रविवारपासून खुली करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात काही कामे शिल्‍लक असताना शिवसृष्टी खुली आली. याबाबत मिळालेल्या माहितीनंतर महापौर संज्योत बांदेकर यांनी शिवसृष्टीतील वीज वाहिनी जोडून घेण्याचे काम केले. इतर कामेही लवकरच मार्गी लावू, असे आश्‍वासन बांदेकर यांनी दै. ‘पुढारी’कडे बोलताना दिले.शनिवारी महापौर बांदेकर यांनी शिवसृष्टीला भेट दिली होती. त्यावेळी उर्वरीत कामांची माहिती मनपा अभियंते नरसन्नावर यांच्याकडून घेतली होती. बांदेकर यांनी अधिकार्‍यांना आवश्यक ती कामे तात्काळ पूर्ण करून शिवसृष्टी खुली करण्याची सूचना केली होती.

 बुडाने शिवसृष्टीच्या कामात दिरंगाई केल्यामुळे रविवारी शिवसृष्टी पाहण्यासाठी गेलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला. शिवसृष्टीतील दिवे बंद आहेत. शिवचरित्रावर आधारीत शिल्पांची माहिती देण्यासाठी कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. फरशा काही ठिकाणी उखडल्या आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर उभे असलेले दोन हत्ती कोलमडण्याची  शक्यता आहे. याबाबत दै. ‘पुढारी’ने सोमवारी सचित्र वृत्तांत प्रसिध्द केला.

यानंतर महापौर बांदेकर यांनी शिवसृष्टीला भेट देऊन वीज समस्येची माहिती घेतली. वीज वाहिन्या तोडण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी हेस्कॉम अभियंत्यांना याची माहिती दिली. तुटलेल्या तारा तात्काळ जोडाव्यात, वीजपुरवठा सुरू करावा, अशी सूचना केली. यानंतर शिवसृष्टीचा वीजपुरवठा पूर्ववत झाला.शिवसृष्टीतील फरशा काही ठिकाणी उखडल्या आहेत. त्याचे काम हाती घेण्याची सूचना केली. दोन हत्तींबाबतही अधिकार्‍यांना कळवण्यात आले आहे. शिवसृष्टीत मनपाच्यावतीने सुरक्षा रक्षक  नेमण्याची सूचना देण्यात आली.