Tue, May 21, 2019 04:06होमपेज › Belgaon › एकी राखा,अन्यथा रोषाला सामोरे जा!

एकी राखा,अन्यथा रोषाला सामोरे जा!

Published On: Mar 01 2018 1:44AM | Last Updated: Mar 01 2018 1:28AMबेळगाव : प्रतिनिधी  

बेळगाव नगरपालिकेचे रूपांतर 1984 साली महापालिकेत झाले. त्यानंतर चार अपवाद वगळता आजवर महापौर-उपमहापौरपदी मराठी भाषक सदस्य निवडून आले आहेत.  मराठी भाषकांनी आवळलेली एकीची मूठ मराठीद्वेष्ट्या कन्नडधार्जिण्यांच्या डोळ्यात खुपत असते. आरक्षणामुळे यावेळी मराठी गटाला महापौरपदापासून दूर राहावे लागणार आहे. महापौर-उपमहापौर निवडणूक माध्यमातून मराठी एकीला सुरुंग लावण्यासाठी विरोधक  प्रयत्नशील आहेत. यामुळे महापालिकेतील सर्व 32 नगरसेवकांना सीमाभागातील मराठी भाषकांच्या भावनांची जाणीव ठेवून एकी राखावी लागेल.

बेळगाव ता. पं. आणि महापालिकेवरील मराठी भाषकांचे वर्चस्व मराठीद्वेष्टे आणि कर्नाटक सरकारला नको आहे. यामुळेच ता. पं. व मनपावरील मराठी भाषकांचे वर्चस्व कमी करण्यासाठी ‘करनाटकी’ शासनाने वेळोवेळी चलाखी केली. यावेळच्या आरक्षणात त्यांचे डावपेच यशस्वी झाले आहेत. मराठी गटाला सभागृहात बहुमत असतानाही महापौरपदापासून वंचित राहावे लागणार आहे.  

मनपावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ‘करनाटकी’ नेत्यांनी अनेकवेळा पडद्याआडून खेळी केल्या. गेल्या 6 वर्षांत मनपाला प्रत्येक वर्षी मिळणारे 100 कोटी रुपये विशेष अनुदान, नंतर शहराची स्मार्टसिटी योजनेंतर्गत निवड झाली आणि विविध पक्षांच्या नेत्यांचे डोळे विस्फारले गेले. मनपावर मराठीचे वर्चस्व डावलून आपले  वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पक्षांचे नेते सक्रिय आहेत. 

मराठी भाषकांतील मतभेदांचा फायदा घेऊन राजकारणात वजन वाढविलेल्या जारकीहोळी बंधूंचा मनपावर डोळा आहे. या बंधूंनी मनपाची सत्ता आपल्याकडे राहण्यासाठी तीन वर्षात जोरदार प्रयत्न केले. आपल्या समर्थकाला महापौर करण्यासाठी बंधूंनी कंबर कसली आहे. महापौरपदावरून विरोधी गटात मतभेद आहेत. पण शेवटच्या क्षणी कानडी महापौरासाठी सर्वजण एकत्र येतील, अशी चर्चा आहे.
मागील वेळच्या निवडणुकीत विखुरलेले 32 मराठी सदस्य एकत्र आले. यातून मनपावर मराठी झेंडा अबाधित राहिला. आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर  असताना मनपावर दबदबा निर्माण करण्यासाठी सतीश जारकीहोळी, पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी कंबर कसली आहे.    

मागील निवडणुकीनंतर सर्व मराठी सदस्यांना विश्‍वासात घेऊन काम चालविण्याची ग्वाही ज्येष्ठ सदस्यांनी दिली होती. मात्र वर्षभरात मराठी गटातील कामकाजात सुसंवाद नसल्याचे जाणवत  आले. बहुमत असतानाही चारपैकी तीन स्थायी समिती गमावण्याची नामुष्की मराठी गटावर आली. यातच यावेळच्या निवडणुकीबाबत बुधवारपर्यंत एकत्र चर्चा झालेली नाही.उपमहापौरपदासाठी मराठी गटाने व्यूहरचना न केल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे. आज गुरुवारी होणार्‍या निवडणुकीच्या अंतिम क्षणी मागील वेळच्या स्थायी समिती निवडणूक प्रकाराची पुनरावृती झाल्यास मराठी जनतेच्या रोषाला मराठी सदस्यांना सामोरे जावे लागेल.