Sat, Apr 20, 2019 07:53होमपेज › Belgaon › मधुश्री पुजारी, चिगरे की हळदणकर?

मधुश्री पुजारी, चिगरे की हळदणकर?

Published On: Mar 01 2018 2:02AM | Last Updated: Mar 01 2018 2:02AMबेळगाव : प्रतिनिधी

महापौर आणि  उपमहापौरपदासाठी गुरुवारी (दि.1 मार्च) निवडणूक होणार आहे. त्याआधी बुधवारी सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकही अज्ञातस्थळी रवाना झाले. उपमहापौरपदासाठी सत्ताधारी गटातून मधुश्री पुजारी, मीनाक्षी चिगरे आणि मेधा हळदणकर यांच्यात रस्सीखेच आहे. तर महापौरपदासाठी बसवराज चिकलदिनी आणि सुचेता गडगुंद्री यांपैकी एकट्याची निवड होईल.

महापौरपदासाठी अनुसूचित जमातीचा सदस्य नसल्याने मराठी गटाची कोंडी झाली आहे, तर विरोधी गटातील ज्येष्ठ सदस्य बसवराज चिकलदिनी यांनी महापौरपदाच्या शर्यतीत 16 सदस्यांसह आघाडी घेतली आहे. ते माजी मंत्री सतीश जारकिहोळी समर्थक आहेत, तर पालकमंत्री रमेश जारकिहोळी समर्थक नगरसेविका सुचेता गडगुंद्री यांना 9 जणांचा पाठिंबा आहे. चिखलदिनी आपल्या समर्थकांसह मंगळवारीच अज्ञातस्थळी रवाना झाले तर गडगुंद्री बेळगावात राहून मराठी गटाच्या नगरसेवकांशी संपर्क साधत होत्या. महापौरपदापासून वंचित रहावे लागणार असल्यामुळे हिरमोड झालेल्या सत्ताधारी गटाने गुरुवारच्या निवडणुकीबाबत उदासिनता दाखवली आहे. गुरुवारी दुपारी गटातील सदस्यांना अज्ञातस्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यावेळी काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. प्रादेशिक आयुक्त पी. ए. मेघण्णावर यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार उद्या निवडणूक होईल. महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवल्यामुळे मराठी भाषिक गटाचे बहुमत असतानाही महापौरपदापासून वंचित रहावे लागणार आहे.