Wed, May 22, 2019 06:15होमपेज › Belgaon › मार्चपासून रिक्षांना मीटर सक्‍ती

मार्चपासून रिक्षांना मीटर सक्‍ती

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 22 2018 11:19PMबेळगाव ; प्रतिनिधी 

शहरामध्ये रिक्षांना एक मार्चपासून मीटर सक्ती करण्याची योजना असून याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येणार आहे. मीटर नसणार्‍या रिक्षांना पेट्रोल व गॅस न भरण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त राजाप्पा यांनी दिली. शहरामध्ये असणार्‍या रिक्षा चालकांना यापुढे प्रवाशांकडून मीटरनुसार भाडे आकारावे लागणार आहे. त्याबाबत आपल्याकडे तक्रारी आल्या असून रिक्षा चालकांना मीटरची सक्ती करण्यात येणार आहे. आरटीओ खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरामध्ये 6,579 ऑटोरिक्षा आहेत. खरेदी करण्यात आलेल्या रिक्षांची आवश्यक असणारी कागदपत्रे, परवाना प्रमाणपत्र, विमा आदीची तपासणी करण्यात येणार आहे. याची सूचना रिक्षाचालकांना करण्यात आली आहे. 

दि. 22 ते 28 फेबु्रवारीपर्यंत रिक्षा चालकांना मीटर बसवण्यासाठी  मुदत देण्यात आली आहे. कागदपत्र नसणार्‍या रिक्षांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. रिक्षा चालकांना यापुढे मीटरनुसारच भाडे आकारावे लागणार आहे. ज्याप्रमाणे हेल्मेट सक्ती, नो हेल्मेट, नो पेट्रोलचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, त्या प्रमाणेच रिक्षा चालकांनाही मीटर बशवण्याची सक्ती करण्यात येणार असल्याचे राजाप्पा यांनी  सांगितले.