होमपेज › Belgaon › एकीसाठी ‘मध्यवर्ती’ने घ्यावा पुढाकार

एकीसाठी ‘मध्यवर्ती’ने घ्यावा पुढाकार

Published On: Feb 05 2018 1:59AM | Last Updated: Feb 04 2018 11:39PMबेळगाव  :  प्रतिनिधी

गटातटाच्या राजकारणामुळे सीमाभागातील मराठी भाषकांचे नुकसान होत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत याचा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व मराठी भाषकांना एकत्रित आणण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीने 25 फेब्रुवारीपर्यंत प्रयत्न करावेत, असा ठराव करण्यात आला. मराठा मंदिर सभागृहात रविवारी सीमाभागातील म. ए. समिती कार्यकर्त्यांची एकीसाठी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी उपरोक्त ठराव टाळ्यांच्या गजरात संमत करण्यात आला. सीमाभागातील मराठी भाषिक वेगवेगळ्या गटातटात विखुरले आहेत. नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे संघटना धोक्यात आली आहे. यामुळे सीमाभागातील मराठी युवा कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन बैठक बोलाविली होती. पहिल्याच बैठकीला चांगला प्रतिसाद मिळाला. 

मतभेदाना तिलांजली देऊन समस्त सीमाबांधवांनी मराठीच्या झेंड्याखाली एकत्र  येण्याचे आवाहन करण्यात आले. यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत मध्यवर्ती म. ए. समितीने प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली. श्रीकांत कदम म्हणाले, सीमाभागात मराठी माणूस अडचणीत येत आहे. यासाठी गटातटांना तिलांजली देण्याची आवश्यकता आहे. समितीत 2008 पासून बेकी निर्माण झाली. यामुळे समितीला अपेक्षित यश मिळविताना अडचणी येत आहेत.  प्रत्येक गटाने एकीसाठी प्रतिसाद द्यावा. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एकीसाठी प्रयत्न करण्यात येणार असून यासाठी मराठा क्रांती मूक मोर्चाच्या धर्तीवर मराठी कार्यकर्ते एकत्रित प्रयत्न करणार आहेत.

दैविक हळदणकर म्हणाले, जातीजातीमध्ये  दुही निर्माण झाल्यामुळे समितीचे वर्चस्व कमी होत आहे. अन्य मराठी भाषक जातींना समितीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावेत.  मोतेश बारदेसकर म्हणाले, समिती मराठी भाषकांची आई आहे.  तिच्याशी बेईमानी करण्याचा प्रयत्न करू नका. वॉटसअ‍ॅपवर रमणार्‍या नव्या पिढीला रस्त्यावरच्या लढाईचा विसर पडला आहे. चळवळीमध्ये रस्त्यावरची लढाई महत्त्वाची असते. भागोजी पाटील म्हणाले, समिती ही नेत्यांची वैयक्तिक मालमत्ता नसून ती सीमाभागातील मराठी भाषकांची आहे. मराठी माणूस एकत्रित आला तर सहा मतदारसंघांत सहज विजय मिळू शकतो. यासाठी गल्लोगल्ली, गावागावातून एकीचे ठराव करावेत. एकी झाल्याशिवाय नेत्यांना प्रवेश देऊ नये.

नगरसेवक विनायक गुंजटकर म्हणाले, म. ए. समितीला राष्ट्रीय पक्षांनी घेरले आहे. हिंदुत्ववादी संघटनांचा फटका बसत आहे. यामुळे युवकांनी सावध होण्याची गरज आहे.  सुरेश शिरोळे, प्रमोद लाड, दीपक हळदणकर, राजू पावले, अनंत किल्लेकर, अरुण कानूरकर, आप्पाजी कुंडेकर, संदीप खन्नूकर, विनायक पाटील, सुधीर नेसरीकर, नारायण कणबरकर, लक्ष्मण पाटील यांनी बैठकीत सूचना  मांडल्या. म. ए. समितीचे कार्यकर्ते दौलतराज गोडसे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीला कार्यकर्ते उपस्थित होते.


गटातटाच्या राजकारणामुळे मराठी भाषिकांत संभ्रम निर्माण होत आहे. कार्यकर्ते सैरभैर होत आहेत. यासाठी पहिल्यांदा गटतट, संघटना यांचे पहिल्यांदा अस्तित्व संपविले पाहिजे. त्या विसर्जित करून मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली काम करावे.  मनपा निवडणुकीत मराठी भाषिकांनी निवडून दिलेले नगरसेवक जारकीहोळीच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत. हे दुदैव आहे. यासाठी एकी महत्त्वाची ठरणार आहे.

 रमेश मोदगेकर

समिती नेत्यांनी दोन आमदाराचे सहा आमदार करण्याची गोष्ट करावी. ती शून्य करण्याची भाषा करू नये. सीमाप्रश्‍न जिवंत ठेवण्यासाठी कार्य केल्याचे भाषा बोलून आपली पाठ थोपटून घेणार्‍यांनी सीमाप्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा. एकी करण्यापूर्वी बेकी कशामुळे झाली याची चर्चा पहिल्यांदा करावी. यामुळे एकी करणे सुलभ होईल. नेत्यांनी केवळ निवडणुकीच्या तोंडावर कार्यरत होण्यापेक्षा समितीच्या प्रत्येक लढ्यात सातत्याने भाग घ्यावा.

- श्रीकांत मांडेकर


नेते वेगवेगळ्या संघटनामध्ये विखुरले आहेत. मात्र सीमाभागातील मराठी माणूस आजही प्रामाणिक आहे. त्याचा जीव सीमाप्रश्‍नासाठी आजही तुटतो. कार्यकर्त्यामध्ये महाराष्ट्रात जाण्याची दुर्दम्य इच्छा आहे. कार्यकर्त्यांना विभागणार्‍या नेत्यांना पहिल्यांदा एकत्र आणावे लागेल. मध्यवर्ती म. ए. समिती न्यायालयीन लढाई लढत आहे. त्यांचे कार्य सुरू आहे.  लढ्यामध्ये येणारे अडथळे दूर सारून सर्वानी एकत्र येणे काळाची गरज आहे.

-रणजित हावळण्णाचे

प्रत्येक कार्यकर्त्यांने मी चुकीच्या नेत्याच्या बाजूने जात नाही, याची खात्री करावी. लढ्याला खीळ घालणार्‍यांना जाब विचारावा लागेल. सीमाप्रश्‍नासाठी एखादा मोठा लढा पुकारण्यात यावा. सीमाप्रश्‍नी जनआंदोलन उभारण्याची आवश्यकता असून मध्यवर्तीने पुढाकार घ्यावा.  सीमाभागातून बेकीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येकाच्या मनातून एकी होणे गरजेचे आहे झाली पाहिजे.नेत्यांना बिघडण्याची संधी कार्यकर्त्यांनी देऊ नये.

-नितीन खन्नूकर