Sun, Jul 21, 2019 09:50होमपेज › Belgaon › एपीएमसी आवारात मराठीत फलक लावा 

एपीएमसी आवारात मराठीत फलक लावा 

Published On: Jan 24 2018 1:22AM | Last Updated: Jan 23 2018 8:25PMबेळगाव : प्रतिनिधी

एपीएमसी आवारामध्ये तालुक्यासह परिसरातील शेतकरी विविध कृषी उत्पादने घेऊन बाजारपेठेत येतात. यामध्ये तालुक्यातील शेतकर्‍यांसह महाराष्ट्रातील शेतकरीही  बाजारपेठेत येतात. यासाठी येणार्‍या शेतकर्‍यांना सोयीचे व्हावे, याकरिता एपीएमसी आवारात लावण्यात येणारे फलक तसेच कोनशिला नामफलक कन्नडसह मराठीत लावण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन एपीएमसी सदस्यांकडून अध्यक्ष निंगाप्पा जाधव यांना देण्यात आले. 

एपीएमसी बाजारपेठेत नव्याने उभारण्यात आलेल्या भाजीमार्केटचे उद्घाटन दि.27 रोजी करण्यात येणार आहे. तसेच रविवारचा बाजार, नवीन भाजी मार्केटसाठी उभारण्यात आलेल्या  स्वागत कमानीचे  तसेच एपीएमसी बाजारपेठ स्थापना करून 50 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. हा संयुक्त कार्यक्रम दि.27 रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका केवळ कन्नड भाषेमध्येच छापण्यात आल्या आहेत. यामुळे मराठी भाषिक शेतकर्‍यांना याची माहिती मिळणे कठीण जाते.

त्यासाठी बाजारपेठेच्या आवारात आयोजित कार्यक्रमांची माहिती मराठीमध्ये उपलब्ध करून देण्यात यावी.  याबरोबरच उद्घाटनसाठी लावण्यात येणारे जाहिरात फलक, बाजारपेठेचे नामफलक, बॅनर मराठीमध्येही लावण्यात यावेत, अशी मागणी एपीएमसी सदस्य  महेश कुगजी, आर.के. पाटील, महेश जुवेकर, तानाजी पाटील या सदस्यांनी  केली आहे.