Thu, Apr 25, 2019 13:55होमपेज › Belgaon › संमेलने झाली उदंड दर्जाचे काय

संमेलने झाली उदंड दर्जाचे काय

Published On: Feb 04 2018 9:57PM | Last Updated: Feb 04 2018 9:01PMबेळगाव  : प्रतिनिधी

सीमाभागात होणार्‍या साहित्य संमेलनांनी मराठीची चळवळ गतिमान केली आहे. सीमाप्रश्‍नाला समांतर पूरक चळवळ संमेलनांच्या माध्यमातून राबविण्यात येते. यामुळे संमेलनांना मराठी भाषिकांचा चांगला प्रतिसाद लाभतो. मात्र अलीकडे यामध्ये साचेबद्धपणा येत चालला असून रसिकांच्या हातात नवे काही सापडेनासे झाले आहे. यामुळे संमेलने झाली उदंड, पण दर्जाचे काय, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. बेळगाव, खानापूर व चिकोडी तालुक्यात 15 साहित्य संमेलने नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्याच्या अवधीत होतात. या काळात प्रत्येक रविवारी संमेलने भरविण्यात येतात. या ठिकाणी रसिकांना वैचारिक खाद्याची पर्वणी लाभते. यामुळे सीमाभागातील रसिकांचे डोळे संमेलनांकडे लागून राहिलेले असतात.

बेळगावात 2000 मध्ये भरलेल्या 73 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनानंतर सीमाभागात होणार्‍या संमेलनांची संख्या वाढली. त्यानंतर प्रत्येक भागात संमेलन भरविण्यात येऊ लागले. यातून सीमाभागात होणार्‍या संमेलनांची संख्या 15 वर पोहोचली. कडोली संमेलन 33 वर्षापासून भरविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील संमेलनांनी रसिकांची अभिरुची जपण्याचे काम केले. त्यातून नवे लेखक, कवी, वक्ते निर्माण होण्यास फायदा झाला. मराठीतील दर्जेदार पुस्तके रसिकांपर्यंत पोहोचली. परंतु, अलीकडे संमेलनांचे स्वरूप बदलत  आहे. आयोजनासाठी निधी हवा म्हणून राजकीय नेत्यांना व्यासपीठ देण्यात येत आहे. प्रत्येक संमेलनात ठराविक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. एकाच वक्त्याला दोन-तीन ठिकाणी बोलाविण्यात येते. त्यांच्याकडून नेहमीच्या विचारांचा भडिमार केला जातो. ठराविक कवी, कथाकारांना स्थान मिळते. यातून रसिकांची निराशा होत आहे. परिणामी संमेलनाना मिळणार्‍या प्रतिसादात घट झाल्यास नवल वाटू नये.

याचा व्हावा विचार

  •  संमेलन आयोजकांनी वाचनालये सुरू करावीत.
  •  मराठीतील अभिजात साहित्य रसिकांना सवलतीच्या दरात उपलब्ध करावे
  •  संमेलनाबरोबर वर्षभर व्याख्याने, काव्यवाचन उपक्रमासह वाचन चळवळीला गती देणार्‍या कार्यक्रमाचे आयोजन करावे.
  •  नामवंत वक्ते, कवी यांच्या सोबत स्थानिकांनाही वाव द्यावा.
  •  लेखन कार्यशाळांचे व्हावे आयोजन
  •  विद्यार्थ्यासाठी लेखक आपल्या भेटीला, वाचक-लेखक चर्चांचेे आयोजन करावे.


रसिकांना आकर्षित करण्यासाठी आयोजकांनी कल्पकता दाखवावी. नवे उपक्रम राबवावेत. वाचक हा अर्धा लेखक असतो. त्याचाही संमेलनात समावेश करावा. अन्य भागात होणार्‍या कार्यक्रमांना उपस्थित राहून तेथील चांगले उपक्रम अमलात आणावेत. 

- गुणवंत पाटील, साहित्यिक