Fri, Jul 19, 2019 01:39होमपेज › Belgaon › नांदी झाली आता हवी एकी

नांदी झाली आता हवी एकी

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 22 2018 8:11PMबेळगाव  : प्रतिनिधी

तालुक्यातील  मराठी भाषिकांमध्ये एकीचे वारे वाहायला सुरुवात झाली असून गटातटात विभागलेले कार्यकर्ते मराठीहितासाठी एकवटत आहेत. हे सीमावासीयांच्या दृष्टीने स्वागतार्ह असून याची नांदी बेळगुंदी येथे मंगळवारी झालेल्या बैठकीतून झाली. म. ए. समितीच्या दोन्ही गटांनी एकत्र येऊन मराठीहितासाठी एकत्र कार्य करण्याचा निर्धार केला आहे. याची व्याप्ती आगामी काळात वाढण्याची आवश्यकता आहे. तालुक्यातील पश्चिम भाग मराठी भाषिकांचा बालेकिल्ला आहे. या भागात शंभर टक्के मराठी भाषिक जनता आहे. परंतु काही दिवसांपासून समितीत सुरू झालेल्या गटाच्या राजकारणातून काहींनी राजकीय पक्षांचा मार्गपकडला. याचा फटका समितीला अनेक निवडणुकांमध्ये सहन करावा लागला. यामुळे अडचणीत आलेला मराठी माणूस एकवटत चालला असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

सीमाभागातील मराठी युवकांनी एकत्र येऊन काही दिवसापासून  ‘समितीचे पाईक’ या माध्यमातून गटातटात विखुरलेल्या मराठी नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यांनी पहिल्या टप्प्यात म. ए. समितीच्या प्रमुख नेत्यांना एकीबाबत निवेदने दिली. मराठीहितासाठी नेत्यांनी एकत्र येण्याची मागणी केली. यामुळे सीमाभागातील वातावरण ढवळून निघाले असून दबाव वाढत आहे. मंगळवारी मध्यवर्ती म. ए. समितीच्या झालेल्या बैठकीत याबाबत स्पष्ट निर्णय घेण्यात आला. अध्यक्ष दीपक दळवी यांनी आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची दुही नाही. ज्यांना समितीमध्ये काम करायचे आहे, त्यांच्यासाठी समितीचे दरवाजे कायम खुले असल्याचे सांगितले.

कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. समितीतून कोणालाही हटविण्यात आलेले नाही. काहीजणांना पदापासून काही काळापुरते दूर केले होते. येतील त्यांना घेऊन समितीचे काम सुरू आहे. अनेक जणांना समितीमध्ये सामावून घेण्यात आले असून यापुढेही येतील त्यांना घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. तालुक्यातील दुसर्‍या गटाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यांनीही मराठीसाठी एकत्र येण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे एकीची प्रक्रिया सुरू होण्यातील अडथळे दूर होण्यास प्रारंभ झाला आहे. यावर बेळगुंदी येथे झालेल्या बैठकीने

शिक्‍कामोर्तब झाला असून त्याला व्यापक रूप येण्याची आवश्यकता आहे. मुख्य गटातील कार्यकर्ते एकत्र येण्यास सुरुवात झाल्याने लहान-सहान गटांनीही एकत्र येण्याची आवश्यकता आहे. यातून मराठीहित साधले जाणार आहे. यासाठी मराठी भाषकांनी दबाव वाढवण्याची गरज असून मनोमीलनासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.