Sat, Jul 20, 2019 15:28होमपेज › Belgaon › मराठी बनावी पोटाची भाषा

मराठी बनावी पोटाची भाषा

Published On: Feb 28 2018 1:17AM | Last Updated: Feb 27 2018 9:23PMबेळगाव : प्रतिनिधी

मराठी भाषा अतिशय प्राचीन असून समृद्ध आहे. त्यामुळे मराठी भाषेला  मरण नाही.  परंतु, भाषेचा विस्तार होण्यासाठी ती ज्ञानभाषेबरोबरच पोटाची भाषा बनणे आवश्यक आहे. जगातील अद्ययावत ज्ञान त्या विशिष्ट भाषेतून उपलब्ध झाल्यास त्या भाषेला कधीच मरत नसते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून दै ‘पुढारी’च्या बेळगाव कार्यालयात ‘मराठी भाषेचे भवितव्य आणि आव्हाने’ या विषयावर मंगळवारी चर्चासत्र आयोजिण्यात आले होते. 

प्राचायर्र् आनंद मेणसे, सरस्वती वाचनालयाचे अध्यक्ष पी. जी. कुलकर्णी, साहित्यिक गुणवंत पाटील, येळ्ळूर साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे यांनी सहभाग घेतला. प्रास्ताविक करताना निवासी संपादक गोपाळ गावडा म्हणाले, भाषा हे व्यक्त होण्याचे माध्यम आहे. त्यासाठी भाषेतील क्लिष्टता कमी होऊन त्यामध्ये सुटसुटीतपणा येण्याची गरज आहे. प्राचार्य मेणसे म्हणाले, जगभरात जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर 1990 च्या काळात बोलीभाषांचा अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला. ज्या बोलीभाषांना स्वतंत्र अशी लिपी नाही, अशा भाषा काळाच्या ओघात लुप्त होत आहेत. जगभरात मराठी भाषेचा वापर करणारे सुमारे 8 कोटीहून अधिक लोक आहेत. यामुळे मराठीला मरण नाही.

गुणवंत पाटील म्हणाले, भाषेची सांगड व्यवसायाशी घातली की ती भाषा मरत नाही. भाषेमध्ये व्यावसायिकता गरजेची असते. मराठी भाषेत अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान याबाबतचे माहिती उपलब्ध झाल्यास इंग्रजी माध्यमाकडे असणारा पालकांचा ओढा कमी होईल. पी. जी. कुलकर्णी म्हणाले, मराठी भाषा टिकविण्यासाठी प्राथमिक शाळा टिकवाव्या लागतील.  यासाठी प्रत्येकाने आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा. एकेकाळी बेळगावातील विणकर समाज शंभर टक्के मराठी होता. मात्र त्याठिकाणी कानडीचा प्रभाव वाढला आहे. यासाठी सीमाभागातील मराठी संस्थानी एकत्रित काम करावे. परशराम मोटराचे म्हणाले, भाषा टिकण्यासाठी वाचन संस्कृती वृद्धिंगत करावी लागेल. यासाठी प्रत्येक मराठी भाषिकाने किमान एखादे तरी मराठी पुस्तक विकत घेवून वाचावे. व्यवस्थापक बाळासाहेब नागरगोजे यांनी आभार मानले.

भाषा ही वेगवेगळ्या माध्यमातून प्रकट होत असते. शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित असणारे समाज शिक्षण घेतल्यानंतर व्यक्त होऊ लागले. त्यांचे अनुभव साहित्यात उमटू लागले. यातून भाषा समृद्ध होत गेली. नव्या शब्दांची भर पडली.यातून बोलीभाषेची वैशिष्ट्ये जपायला हवीत. मात्र दीर्घकालीन परिणामांसाठी प्रमाणित भाषा आवश्यक असते. देशात शिक्षणावर होणारा खर्च अत्यल्प असून त्यामध्ये वाढ होण्याची गरज आहे.
प्राचार्य आनंद मेणसे

भाषेमध्ये बोलीभाषा व प्रमाणित भाषा असा भेदभाव नाही. कोणत्याही भाषेतील शब्द हे व्यवसाय आणि गरजेतून निर्माण होतात. लोकांना आवश्यक असणारे शब्द साहित्यात आले पाहिजेत तरच साहित्य टिकेल. कोणतीही गोष्ट उत्कृष्ट केल्यास त्याचा परिणाम होतो. भाषा हे सुसंस्कृत असावी. ती प्रमाण भाषेच्या जवळ जाणारी असावी. स्वपणाच्या शोधात लिहिलेले साहित्य श्रेष्ठ ठरते. बंडखोरीतून साहित्याची निर्मिती होते.       

 गुणवंत पाटील, साहित्यिक

मराठी भाषेला कोणताही धोका नाही. मात्र भाषा समृद्ध करण्याचे काम प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. एकमेकांच्या सहकार्याशिवाय मराठी समृद्ध होणार नाही. विशेषत: सीमाभागात मराठी जिवंत ठेवण्यासाठी सर्व संस्थानी एकत्र येऊन कार्य करावे. यासाठी मराठी शाळा वाचविण्याची मोहीम हाती घ्यावी. भाषेच्या हितासाठी आपापसामध्ये असणारा दुरावा संपवून एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. यातच मराठीचे हित आहे.
                    - पी. जी. कुलकर्णी

इंग्रजी माध्यमाच्या शाळा वेगाने फोफावत आहेत. मराठी शाळा बंद पडत आहेत. हा मराठीसाठी धोका आहे. भाषा टिकविण्यासाठी शाळा महत्त्वाचे काम करतात. मुले मराठी माध्यमाच्या शाळेत दाखल व्हावीत, यासाठी शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.त्याचबरोबर वाचनसंस्कृतीदेखील वृद्धिंगत व्हावी. घरोघरी पुस्तकांचे वाचन होणे आवश्यक असून यासाठी पुस्तके विकत घेण्याची प्रवृती वाढली पाहिजे.     
                 - परशराम मोटराचे