Mon, Apr 22, 2019 22:21होमपेज › Belgaon › एकीसाठी समितीचे दरवाजे खुले

एकीसाठी समितीचे दरवाजे खुले

Published On: Feb 21 2018 1:21AM | Last Updated: Feb 21 2018 12:06AMबेळगाव  :  प्रतिनिधी

सीमाभागात  वेगवेगळ्या  गटातटांत विखुरलेल्या मराठी बांधवांची एकी व्हावी, यासाठी युवकांनी हाती घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे. सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी सीमाबांधवांनी एकत्रित राहणे आवश्यक आहे. परंतु, आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची दुही नाही. सीमाप्रश्नाच्या लढ्यासाठी आम्ही लढा देत आहोत. समितीतून कधीच कोणाला बाहेर काढण्यात आलेले नाही. मराठी हितासाठी म. ए. समितीचे दरवाजे सदैव उघडे असून ज्यांना काम करायचे आहे, त्यांचे स्वागत असल्याचा निर्णय मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात  आला. 

मराठा मंदिर येथे मध्यवर्ती म. ए. समितीची  मंगळवारी बैठक आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानजनक वक्तव्य करणार्‍या श्रीपाद छिंदम याचा निषेध  करण्यात आला. बैठकीत एकीबाबत युवकांनी सुरू केलेल्या मोहिमेबाबत चर्चा करण्यात आली. युवकांनी सुरू केलेल्या मोहिमेला एकत्रित उत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला. दीपक दळवी म्हणाले, समितीच्या कार्यातून कोणालाही दूर करण्यात आलेले नाही.

येतील त्यांना घेऊन सीमाप्रश्नाचे काम सुरू आहे. यामुळे आमच्यामध्ये दुही आहे, यावर माझा विश्‍वास नसून मराठीसाठी सारेजण एक आहोत.माजी आ. मनोहर किणेकर म्हणाले, 2008 मध्ये प्रा. एन. डी. पाटील यांच्या उपस्थितीत तालुका म. ए. समितीची पुनर्रचना झाली. त्यावेळी समितीतून कोणालाही हटविण्यात आले नाही. केवळ पदावरून दूर केले होते. त्यानंतर समितीपासून दूर झालेले पुन्हा समितीच्या मुख्य प्रवाहात सहभागी झाले आहेत. त्यांचे आम्ही नेहमी स्वागत केले आहे.

तालुक्यातील म. ए. समितीच्या दुसर्‍या गटाने एकीला सकारात्मक प्रतिसाद दाखविला आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. स्थानिक कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार समितीत नेत्यांना सामावून घेण्यात  येईल.अ‍ॅड. ईश्‍वर मुचंडी म्हणाले, एकदा एकी केल्यानंतर बेकी न करण्याची हमी कार्यकर्त्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. बी. डी. मोहनगेकर म्हणाले, एकीची मागणी करणार्‍यांनी पहिल्यांदा आपल्या वेगळ्या चुली बंद कराव्यात, आणि समितीत सहभागी व्हावे.

यावेळी आ. अरविंद पाटील, माजी आ. दिगंबर पाटील, मालोजी अष्टेकर,अ‍ॅड. राजाभाऊ पाटील,  सुरेश राजुकर, तानाजी पाटील , एस. एल. चौगुले यांनी सूचना मांडल्या.  प्रारंभी म. ए. समितीच्या दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बाबुराव पिंगट, नगरसेवक विजय पाटील, जग्गनाथ बिर्जे, मारुती परमेकर, जयराम मिरजकर, डी. एल. आंबेवाडीकर, रणजित पाटील, राजू मरवे, गोपाळ देसाई, एल. आय. पाटील, नोहर हुक्केरीकर आदी सदस्य उपस्थित होते.