Mon, Jun 17, 2019 02:23होमपेज › Belgaon › कलखांबच्या मनीषाची पॅरा ऑलिम्पिकपर्यंत मजल

कलखांबच्या मनीषाची पॅरा ऑलिम्पिकपर्यंत मजल

Published On: Feb 10 2018 1:28AM | Last Updated: Feb 09 2018 11:33PMबेळगाव : महेश पाटील       

लवकरच  होणार्‍या  आशियन पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय व्हीलचेअर बास्केटबॉल स्पर्धेसाठी बेळगाव तालुक्यातील कलखांब येथील मनीषा पाटील हिची निवड झाली आहे. पॅरा ऑलिम्पिक  स्पर्धेमध्ये बेळगाव तालुक्यातून बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड होणारी मनीषा पाटील ही पहिली खेळाडू आहे.  येत्या 2 मार्चपासून थायलंड येथे होणार्‍या आशियन पॅरा ऑलिम्पिक  स्पर्धेमध्ये व्हीलचेअर बास्केटबॉल  स्पर्धेत भारतीय संघात मनीषा पाटील हिची निवड झाली आहे. भारतीय महिला संघामध्ये निवड होण्यासाठी तिने घेतलेले परिश्रमही तितकेच कारणीभूत आहेत. सध्या महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे सुरू असलेल्या प्रशिक्षण शिबिरात ती सहभागी झाली आहे. येत्या 27 फेब्रुवारीपर्यंत या सराव शिबिरात तिचा सहभाग राहणार आहे.

मनीषा पाटीलने जिद्दीच्या जोरावर पॅरा ऑलिम्पिक  स्पर्धेपर्यंत मजल मारली असली तरी तिच्या मदतीसाठी अद्यापही शासन व संघ संस्थांकडून म्हणावी तशी मदत झालेली नाही. जन्मताच पोलिओ झाला तरी तिने शिक्षण घेत असतानाच खेळाकडे दुर्लक्ष केले नाही. कोणत्याही परिस्थितीत आपणावर आलेल्या या संकटावर मात करून आपण काहीतरी वेगळे  केले पाहिजे या जिद्दीतून तिने व्हीलचेअरच्या माध्यमातून बास्केटबॉल खेळण्यास प्रारंभ केला. सुरूवातीला व्हॉलीबॉल खेळत असतानाच तिने आपले लक्ष बॉस्कटेबॉलकडे वळविले. 

2016 मध्ये म्हैसूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील अपंग क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन प्रथम क्रमांक प्राप्‍त केला. याच  स्पर्धेत तिला भालाफेक  स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्‍त झाला.  गेल्यावर्षी तिची व्हीलचेअर बॉस्केटबॉल स्पर्धेत निवड झाली. हैद्राबाद येथे झालेल्या व्हीलचेअर बॉस्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आयोजित स्पर्धेत भाग घेऊन तिने कर्नाटक संघाला यश मिळवून दिले. त्यानंतर तिला चेन्नई येथे प्रशिक्षण देण्यात आले. कलखांबसारख्या गावातून गरीब परिस्थितीतून संकटावर मात करून मनीषा पाटीलने ऑलिम्पिक  स्पर्धेपर्यंत मजल मारली. ही बेळगावसाठी अभिमानाची गोष्ट आहे.