Wed, Apr 24, 2019 01:30होमपेज › Belgaon › बेळगावातील आमदार निवासबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : रेवण्णा

बेळगावातील आमदार निवासबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : रेवण्णा

Published On: Jun 18 2018 1:09AM | Last Updated: Jun 18 2018 12:13AMबेळगाव : प्रतिनिधी

येथील सुवर्ण विधानसौधमध्ये आमदार निवास उभारण्याबाबत मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री एच. डी. रेवण्णा यांनी दिली. जि. पं. कार्यालयात बेळगाव, बागलकोट, विजापूर जिल्ह्यातील अधिकार्‍यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी जिल्ह्यातील खासदार, आमदार, जि. पं. अध्यक्ष-उपाध्यक्ष, अधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम  खात्याच्या अभियंत्यानी मंत्री रेवण्णा यांच्याकडे प्रश्‍न उपस्थित केला.

याबाबत अभियंता म्हणाले, बेळगावात राज्याचे प्रत्येक वर्षी अधिवेशन घेण्यात येते. या दरम्यान राज्यातील मंत्री, आमदार व अधिकारी येथे येतात. त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी हॉटेलमध्ये बराच खर्च करावा लागतो. यासाठी येथील सुवर्ण विधानसौध आवारात आमदार निवास उभारण्यात यावे. उपरोक्‍त सूचनेला खा. सुरेश अंगडी यांनीही दुजोरा देऊन आमदारभवन उभारण्याची मागणी रेवण्णा यांच्याकडे केली.

रेवण्णा म्हणाले, आमदारनिवास उभारण्याबाबत मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याशी चर्चा करण्यात येईल. याबाबत सरकार सकारात्मक असून प्रयत्न करण्यात येतील.मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या कार्यकाळात बेळगाव येथे सीमाभागातील मराठी भाषकांना खिजवण्यासाठी सुवर्ण विधानसौध उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर हलगा येथील  शेतकर्‍यांची सुमारे 150 एकर पिकाऊ जमीन संपादित करून सुवर्ण विधानसौध उभारण्यात आले. यानंतर वर्षातील केवळ आठ दिवस अधिवेशन घेण्यात येते. यासाठी कोट्यवधी रुपयाचा चुराडा केला जातो.

रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्याच्या सूचना

शिवाजी रोड ते रेल्वे स्टेशन हा रस्ता अतिशय खराब झाला असून दुरुस्तीकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बेनके यांंनी केला. यावर अधिकार्‍यांनी हा रस्ता आपल्याकडे येत नसल्याचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला. मात्र आ. बेनके यांनी अधिकारी जबाबदारी झटकत असल्याचे सांगितले. यावर रेवण्णा यांनी अधिकार्‍यांनी त्वरित दुरुस्ती काम हाती घ्यावे, अशी सूचना केली.