Tue, Mar 19, 2019 09:14होमपेज › Belgaon › बेळगाव-कोल्हापूर एस.टी. बससेवा ठप्प

बेळगाव-कोल्हापूर एस.टी. बससेवा ठप्प

Published On: Jun 10 2018 1:47AM | Last Updated: Jun 10 2018 12:05AMबेळगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील एस.टी.बस कर्मचार्‍यांनी संप पुकारल्याने बससेवा ठप्प असल्यामुळे कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणार्‍या बसेसही सध्या बसस्थानकातच विश्रांती घेत आहेत. बेळगाव-कोल्हापूरसह बेळगावहून महाराष्ट्रात जाणार्‍या सार्‍याच बस बंद आहेत. परिणामी, महाराष्ट्रात जाणार्‍या प्रवाशांचे हाल सुरू आहेत. 

महाराष्ट्रातील अंतर्गत तसेच आंतरराज्य बससेवा बंद झाल्याने महाराष्ट्रातून एकही बस सीमाभागात किंवा कर्नाटकात गेले दोन दिवस आलेली नाही. त्यामुळे कर्नाटकानेही एकही बस महाराष्ट्रात पाठवलेली नाही. बस सुरू ठेवल्या तर अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी म्हणून बेळगावमधून महाराष्ट्रात जाणार्‍या सर्व सरकारी बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. संप मिटल्यानंतरच सेवा पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रणाधिकारी एम. आर. मुंजी यांनी ‘पुढारी’ला दिली. 

बेळगाव तसेच निपाणीहून कोल्हापूर, सातारा,सोलापूर, पुणे, मुंबई, चंदगड, सावंतवाडी, रत्नागिरी अशा मोठ्या शहरांना बससेवा आहे. त्यातून कर्नाटक परिवहन महामंडळाला मोठ्या प्रमाणात महसुलही मिळतो. बेळगावमधून बससेवा बंद केल्याने बेळगाव डेपोला रोज सुमारे 5 लाखांचा फटका सहन करावा लागत आहे. 

बेळगावमधून कोल्हापूरला जाण्यासाठी निपाणीपर्यंत कर्नाटक बसचा आधार घ्यावा लागत आहे. यानंतर कोल्हापूरला जाण्यासाठी खासगी बसचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाबरोबर आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागत आहे.