Tue, Jul 23, 2019 04:04होमपेज › Belgaon › बेळगाव-खानापूर रस्त्याचे ८९६ कोटींतून चौपदरीकरण!

बेळगाव-खानापूर रस्त्याचे ८९६ कोटींतून चौपदरीकरण!

Published On: Dec 08 2017 1:36AM | Last Updated: Dec 08 2017 12:16AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव ते पणजी या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम नजीकच्या काळात होणार आहे. दरम्यान, बेळगाव ते खानापूर दरम्यानच्या 30 कि. मी. अंतराच्या चौपदरीकरणासाठी 896.81 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या कामासंदर्भात निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून बेळगाव-पणजी महामार्गाच्या चौपदरीकरणाची जोरदार चर्चा सुरू होती. याचवेळी बेळगावपासून पिरनवाडीपर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने बेळगाव ते खानापूर 30 कि. मी. अंतराच्या रस्त्याच्या चौपदरी कामासंदर्भातील निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

बेळगाव शहरातील कॅम्प फिश मार्केट येथून खानापूर शहरापर्यंत दरम्यानच्या अंतरात होणार्‍या चौपदरीकरणात खासगी, तसेच वन विभागाची जागाही संपादित केली जाणार आहे. 30 कि. मी. अंतरात 19 किलोमीटरवर टोलनाकाही उभारण्यात येणार आहे. हा मार्ग राष्ट्रीय महामार्गच्या अंतर्गत येत असून चौैपदरीकरण कामाला 2018 साली सुरुवात होणार आहे. हे काम 3 वर्षांत पूर्ण करण्याची अट निविदेमध्ये घालण्यात आली आहे.

30 कि. मी. अंतरात पहिल्या टप्प्यापासून 15.4 किलोमीटर अंतरापर्यंत 60 मीटर रुंद खासगी जागा, 15.4 किलोमीटरपासून 22 किलोमीटर अंतरापर्यंत 45 मीटर रुंद खासगी व असंरक्षित वन जागा, 22 किलोमीटरपासून 25.9 किलोमीटरपर्यंत 60 मीटर रुंद खासगी जागा, तसेच 27.9 ते 30 किलोमीटर टप्प्यात 45 मीटर रुंद असंरक्षित वनजागा संपादित केली जाणार आहे. बेळगाव ते खानापूर रस्ता चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यास गोव्याला जाण्यासाठी कमी अवधी लागणार आहे. त्यामुळे या चौपदरीकरण कामाकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.