Thu, May 23, 2019 04:18होमपेज › Belgaon › कन्‍नड फलक लावा, अन्यथा आस्थापने बंद

कन्‍नड फलक लावा, अन्यथा आस्थापने बंद

Published On: Jan 23 2018 1:16AM | Last Updated: Jan 23 2018 1:16AMबेळगाव : प्रतिनिधी

ग्रामपंचायती ते नगरपंचायत, परिषदा, नगरपालिका, महापालिका व जि. पं. बेळगावचा सर्व कारभार कन्नड भाषेतूनच करण्यात यावा, असा घटनाबाह्य आदेश बेळगावचे जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांनी दिला आहे. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मनपा आयुक्त शशिधर कुरेर यांनी व्यापारी व उद्योजकांनी कन्नडमध्ये फलक लावले नाहीत तर त्यांची आस्थापने बंद करण्याचा आदेश बजाविला आहे. त्यासाठी 31 जानेवारीपयंर्ंत त्यांनी मुदत दिली आहे. शहरातील सर्व आस्थापनांनी आपल्या परवान्याचे नूतनीकरण 31 मार्चपयंर्ंत करून घ्यावे. अन्यथा 50 टक्के दंड लावण्याचा इशाराही मनपा आयुक्त शशिधर कुरेर यांनी दिला आहे.

मनपा आरोग्य खात्याच्या दृष्टीने शहरातील 7000 पेक्षा जास्त आस्थापनांनी मनपाचे परवानेच घेतलेले नाहीत. त्यामुळे दरवर्षी मनपाचे लाखो रु. च्या महसुलाचे नुकसान होत आहे. कन्नड फलक व रितसर परवान्याासाठी मनपाने सोमवार दि. 22 पासून जागृती मोहीम राबविण्यास प्रारंभ केला आहे. बेळगाव शहरामध्ये आजही बाजारपेठेमधील सर्व व्यवहार प्रामुख्याने मराठी भाषेतून चालतो. शहरामध्ये आजही 50 टक्के जनता मराठी भाषिक आहे. आपल्या मातृभाषेतून किंवा ग्राहकांच्या भाषेतून व्यवहार करण्याचा मूलभूत अधिकार भारतीय घटनेने प्रत्येक नागरिकाला दिला आहे. त्यामुळे कन्नड फलक लावण्याची सक्ती मनपा आयुक्तांना व जिल्हाधिकार्‍यांना करता येत नाही.

परंतु कर्नाटक सरकारकडून  शाब्बासकी मिळविण्यासाठी अधिकारी कन्नड फलकाची सक्ती करणारा आदेश काढतात, असा आरोप केला जात आहे. कन्‍नड भाषेतून फलक लावण्याचा आदेश आयुक्‍तांनी लागू केला असेल तर तो आम्ही हाणून पाडू. कारण, बेळगाव शहरात मराठी भाषिकांची व मनपा सभागृहात मराठी नगरसेवकांचे बहुमत आहे. त्यांना आपल्या मातृभाषेतून कामकाज करण्याचा अधिकार आहे. याउलट मराठी भाषिकांचे घटनात्मक अधिकार पायदळी तुडविण्याचा अधिकार जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना कोणी दिला, असा प्रश्‍न मराठी नगरसेवक व जनतेकडून विचारला जात आहे.