Wed, May 22, 2019 06:24होमपेज › Belgaon › विकासासाठी महाराष्ट्र हाच पर्याय

विकासासाठी महाराष्ट्र हाच पर्याय

Published On: Feb 10 2018 1:28AM | Last Updated: Feb 10 2018 12:14AMबेळगाव : प्रतिनिधी 

जे लढले ते जगले आणि जे लढले नाही ते नामशेष झाले. त्यामुळे स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी लढलेच पाहिजे. म्हणूनच सीमावासीय लढत आहेत आणि विकासासाठी महाराष्ट्रात जाणे हाच पर्याय आहे, असे उद‍्गार मान्यवर नेत्यांनी आज कंग्राळी येथील युवा मेळाव्यात काढले. सीमालढ्याबाबत युवकांमध्ये जागृती करण्यासाठी युवा मेळावा आयोजित करण्यात आला होता. कोल्हापूर जिल्हा परिषद उपाध्यक्ष धैर्यशील माने, कोल्हापूर मध्यवर्ती बँक संचालक रणजितसिंह पाटील, प्रा. डी. डी. बेळगावकर यांनी मेळाव्याला संबोधित केले. 

संघर्ष हाच जीवनाचा पाया आहे. संघर्ष केल्याशिवाय काहीही साध्य होत नाही. हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. त्यामुळे सीमाभागात मराठी संस्कृती टिकविण्यासाठी संघर्ष केलाच पाहिजे. न्यायालयीन लढ्याबरोबर रस्त्यावरची लढाईसुद्धा  सुरू ठेवली पाहिजे, असेही उद‍्गार नेत्यांनी काढले. एपीएमसी सदस्य तानाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याला शहर आणि तालुक्यातून युवक व महिला उपस्थित होत्या. व्यासपीठावर मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक  दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, तालुका समिती अध्यक्ष निंगोजी हुद्दार, जि. पं. सदस्य सरस्वती पाटील, माधुरी हेगडे, तालुका पंचायत सदस्या लक्ष्मी मेत्री, अ‍ॅड. श्याम पाटील होते. 
सीमालढ्यात आतापर्यंत तीन पिढ्या बरबाद झाल्या. चौथी पिढी तरी महाराष्ट्रात जाणे गरजेचे आहे. हाच सीमालढ्याचा 

मुख्य हेतू आहे. विकासासाठी महाराष्ट्र हा एकमेव पर्याय आहे. कर्नाटक सरकार सीमाभागाला नेहमीच सावत्रपणाची वागणूक देत आले आहे. सर्वोच्च न्यायालयातही कर्नाटक वेळकाढूपणा करत आहे. हा प्रश्‍नच अस्तित्वात नाही. असे भासवण्याचा कर्नाटकाचा प्रयत्न आहे. तो महाराष्ट्राने हाणून पाडला पाहिजे, अशी अपेक्षाही नेत्यांनी व्यक्‍त केली. 
राष्ट्रीय पक्ष सीमावासियांना प्रलोभने दाखवून आकृष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आपला लढा संस्कृतीसाठी आणि भाषेसाठी आहे, हे युवकांनी विसरू नये यासाठीच वेळोवेळी मेळावे घेऊन महाराष्ट्रातील नेत्यांनी जागृती करावी, अशी मागणीही नेत्यानी केली.