होमपेज › Belgaon › लेझीम मेळा, ढोल-ताशांचा कडकडाट

लेझीम मेळा, ढोल-ताशांचा कडकडाट

Published On: Jan 15 2018 1:41AM | Last Updated: Jan 14 2018 11:49PM

बुकमार्क करा
कडोली : वार्ताहर

ढोल ताशांचा कडकडाट, भजनी मंडळाचे सुरेल अभंगगायन, आकर्षक लेझीममेळा, सहभागी झालेले प्राथमिक व माध्यमिक      शाळांचे विद्यार्थी, त्यांनी हातात घेतलेले वेगवेगळ्या आशयाचे फलक, नागरिकांच्या नजरा खेचून घेणारे घोडेस्वार, घरासमोर घालण्यात आलेल्या सुंदर रांगोळ्या, डौलाने फडकणारे भगवे ध्वज अशा मंगलमय आणि उत्साही वातावरणात कडोली मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथ दिंडी पार पडली. यामध्ये ग्रामस्थ व मान्यवरांनी भाग  घेतला. 

संमेलनाची सुरूवात ग्रंथदिंडीनी झाली. गावच्या वेशीपासुन दिंडीला प्रारंभ झाला. यावेळी पालखी पूजन बाळाराम जाधव यांच्याहस्ते पार पडले. ग्रंथदिंडीत कडोलीतील शिवमुद्रा ढोल ताशा पथक,  कलमेश्‍वर भजनी मंडळ, कलमेश्‍वर वारकरी संप्रदाय भजनी मंडळ, समर्थ मंगल कार्यालय घोडे पथक, कडोलीतील लेझीम पथक सहभागी झाले  होते.  ग्रंथदिंडीत छ.शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्‍वर, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले,महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी आदी वेशभूषेतील युवक लक्ष वेधून घेत होते. दिंडीमध्ये सरस्वती हायस्कूल हंदिगनूर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, केदनूर  व कडोली सरकारी मराठी मॉडेल स्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले  होते. 

संमेलनाध्यक्ष ज्ञानेश्‍वर मुळे, सुधीर दरेकर, सुमीत पिंगट, सौरभ करडे,  मोहन बेळगुंदकर, ता.पं. सदस्य उदय सिद्दण्णावर, बाबुराव नेसरकर, श्रीशैल देसाई, शिवाजी बाळेकुंद्री, भरमा डोंगरे, संभाजी पवार, ग्रा.पं.सदस्य सुनिल कासार, बाळु पाटील, रणजित गिंडे, किशोर पाटील, सुर्याजी कुट्रे, दीपक होनगेकर, पांडू कालकुंद्रीकर, प्रकाश राजाई, दीपक मरगाळे, अरूण पाटील, देवाप्पा होनगेकर, रमेश कटांबळे, तानाजी कुट्रे, बसवंत मायाण्णाचे, विविध सहकारी संस्था, युवक मंडळे, महिला मंडळे, कडोली ग्रा.पं. सदस्य, साहित्य संघाचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित  होतेे.

मावळ्यांच्या त्यागातून स्वराज्य उभारणी

छ. शिवाजी महाराजांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची उभारणी केली. यासाठी त्यांना डोंगराएवढा त्याग करणार्‍या शिलेदारांनी साथ दिली. मावळ्यांच्या त्यागातून शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची उभारणी झाली असे मत पुणे येथील व्याख्याते सौरभ करडे यांनी व्यक्त केले. कडोली साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या सत्रात करडे ‘स्वराज्याचे शिलेदार’ या विषयावर बोलत होते.  करडे म्हणाले, महाराष्ट्रात सहा पातशहा थैमान घालत होत्या. हजार वर्षे परकीय सत्तांनी महाराष्ट्रावर राज्य चालविले होते. त्यांच्याकडून देश, धर्म, भाषा, संस्कृती भ्रष्ट केली जात होती. लोक अन्यायाने दबले गेले होते.

अत्याचाराने परिसीमा गाठली होती. अशा स्थितीत  महाराजांनी स्वराज्य निर्माण करून जनतेच्या मनात स्वातंत्र्य, स्वाभिमानाचा अंगार निर्माण केला. त्यातूनच छ. शिवाजी महाराजांचे स्वराज्य उभे राहिले. स्वराज्याची स्थापना करण्यात शिवाजी महाराजांचा जितका त्याग कारणीभूत आहे, तितकाच त्याग त्यांच्या शिलेदारांनी केला आहे. त्यांनी घरादारावर तुळसीपत्र आणि हातात निखारा ठेवून स्वराज्याच्या कामात झोकून दिले. आयुष्याची, सुखी संसााराची राखरांगोळी करून  महाराजांना साथ दिली. त्यांनी केलेला त्याग महाराजांनी केलेल्या त्यागाच्या बरोबरीचा होता. 

शिवचरित्र हे खरे तर शिवभारत आहे. त्यामध्ये मावळ्यांनी केलेला त्याग अजोड आहे. तो सांगून संपणारा नाही. अनेक ज्ञात, अज्ञात मावळ्यांनी आपल्या प्राणांची आत्माहुती देवून हा यज्ञ धगधगता ठेवला. प्रत्येक मावळा म्हणजे प्रतिशिवाजीच होता. सह्याद्रीच्या डोंगरदर्‍या, अथांग समुद्र आणि छ. शिवाजी महाराज एकत्र आले आणि इतिहास घडला. शिवाजी महाराज हे धूर्त राजकारणी होते. त्यांनी स्वराज्य उभारणीत प्रत्येक मावळ्याचा कल्पकतेने उपयोग करून घेतला. त्यांना साथ देण्याचे काम निधड्या छातीच्या शिलेदारांनी केले असे सांगून करडे यांनी पन्हाळगडचा वेढा आणि आग्राहून सुटकेचा प्रसंग सांगितला. यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे, मदारी म्हेत्तर, हिरोजी फर्जंद यांच्या त्यागाचा इतिहास कथन केला. 

कविभूषणांच्या काव्याना दाद सौरभ करडे यांनी आपल्या दमदार वक्तृत्वातून अनेक दाखले देत रसिकांना इतिहासात रमविले. ओघवत्या व स्पष्ट उच्चारातून कविकलश यांच्या  शिवाजी महाराजांचे वर्णन करणार्‍या कवितेच्या ओळी उत्कृष्टपणे सादर केल्या.  त्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.