Fri, Apr 26, 2019 20:10होमपेज › Belgaon › पाणीप्रश्‍नावरुन केडीपी बैठकीत पुन्हा गदारोळ 

पाणीप्रश्‍नावरुन केडीपी बैठकीत पुन्हा गदारोळ 

Published On: Jan 30 2018 1:55AM | Last Updated: Jan 29 2018 11:20PMबेळगाव : प्रतिनिधी 

जिल्ह्यातील अनेक पाणी योजना अर्धवट असून त्या कधी पूर्ण होणार, असा  प्रश्‍न करत जिल्ह्यातील आमदारांनी पालकमंत्री रमेश जारकीहोळी व जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन यांना धारेवर धरले. त्यामुळे पाणी प्रश्‍नावरुन कर्नाटक विकास कार्यक्रमाच्या बैठकीमध्ये एकच गदारोळ माजला.  अधिकार्‍यांनी थातुरमातूर उत्तरे देण्यास प्रारंभ केल्यामुळे आमदार आणखी भडकले व त्यांनी तालुकावार पाणी योजनांची आढावा बैठक घेण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे केली. तर मोहन मोरे यांनी तुरमुरी कचरा डेपोकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले  व त्या कचरा डेपोमुळे त्या परिसरातील विहिरींचे पाणी दूषित होत असल्याचे सांगितले. त्यावर पालकमंत्री, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी एक शब्दही काढला नाही.

आ. उमेश कत्ती यांनी हुक्केरी व संकेश्‍वर येथील पाणी समस्या मांडली. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍याने एक महिन्यात त्या योजनेची निविदा काढून कंत्राटदार निश्‍चित करुन योजनेचे काम सुरू करतो, असे आश्‍वासन दिले.  बेळगाव जिल्ह्यातील समूह पाणी योजना व इतर महत्त्वाच्या योजना पूर्ण करुन घेण्याची संपूर्ण जबाबदारी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची असल्याची जाणीव करुन देण्यात आली. पाणी योजनांना तांत्रिक व आर्थिक मंजुरी मिळवून देण्याचे काम हे पालकमंत्र्यांचे आहे. पालकमंत्र्यानी कॅबिनेट बैठकीमध्ये सदर योजनांचा प्रस्ताव ठेवून त्यांना मंजुरी घेतली पाहिजे, असे अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी सांगितले. एका कंपनीने बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील चौदा जिल्ह्यांमधील नागरिकांना 400 कोटी रुपयांना फसविले आहे. त्याबद्दल पोलिस खात्याने फसलेल्या नागरिकांच्या तक्रारी घेऊन त्या कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी केली. 

यावेळी आ. अरविंद पाटील यांनीही खानापूरमध्ये एका व्यक्‍तीने नागरिकांना एक कोटी रुपयांना टोपी घातलेली आहे. त्या व्यक्‍तीने नागरिकांना बोगस चेक देऊनही फसविले असल्याची तक्रार केली. 
कुडची (ता. रायबाग) चे आमदार पी. राजीव यांनीही आपल्या मतदार संघातील पाणी समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले. सरकारी व वरिष्ठ अधिकार्‍यांनी आदेश बजावलेले असले तरी कनिष्ठ अधिकारी अंमलबजावणी करीत नसल्याची तक्रार केली. आमदार दुर्योधन ऐहोळे यांनीही आपल्या मतदारसंघातील समूह पाणी योजना अर्धवट ठेवल्या असल्याचा आरोप केला. 

तालुक्यांना भेटी : सीईओ

मुख्य कार्यकारी अधिकरी आर. रामचंद्रन यांनी आपण स्वतः प्रत्येक तालुक्याला भेटी देऊन सर्वच पाणी योजनांचा आढावा घेणार असल्याचे सांगितले. महसूल व ग्राम पंचायत व्याप्तीमधील संगणकीय उतारे मिळत नसल्याची तक्रार आ. उमेश कत्ती यांनी केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी त्या संदर्भात आपल्याकडे तक्रारी आल्या असून इंटरनेट सुविधा दुरुस्त करण्याच्या सूचना आपण केल्या असल्याचे सांगितले.  बैठकीला जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे, उपाध्यक्ष अरुण कटांबले, आ. गणेश हुक्केरी व विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.