होमपेज › Belgaon › तापमान वाढता, वाढता वाढे 

तापमान वाढता, वाढता वाढे 

Published On: Feb 28 2018 1:17AM | Last Updated: Feb 27 2018 9:18PMबेळगाव : प्रतिनिधी

गेल्या आठ दिवसांत बेळगाव शहरासह जिल्ह्यात हळूहळू तापमानात वाढ होत आहे. मंगळवारी 28 रोजी बेळगाव शहरात 33 डिग्री पर्यंत तापमानात वाढ झाली. बेळगाव परिसरात गतवर्षीच्या तुलनेत यंदा किमान तापमानात वाढ झाली आहे. गतवर्षी याच आठवड्यात किमान तापमान 18 ते 20 डिग्रीपर्यंत होते. तर यंदाचे किमान तापमान 19 ते 22 डिग्रीपर्यंत आहे. कमाल तापमान गतवर्षी 34 ते 35 डिग्रीपर्यंत होते. तर यंदा तेच तापमान 33 डिग्रीपर्यंत आहे. यावरून यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमाल तापमानात घट तर किमान तापमानात वाढ झाली आहे.  सकाळी 10 नंतर तापमानात वेगाने बदल होत आहे.

यंदाच्या तापमानात ग्लोबल वार्मिंगचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आठवडाभरात 4 ते 6 डिग्री ने वाढ झाली आहे. पहाटे पासून थंडी अन रात्री उशिरापर्यंत हवेत उष्मा जाणवत आहे. यंदाच्या पावसात कधी उष्णता, कधी थंडी असेच सतत बदलते हवामान अनुभवास आले. हिवाळा ॠतू संपता संपता काही ठिकाणी पावसाच्या थेंबाने हजेरी लावली. काही दिवस ढगांनीही आपले रूप बदलले.

या सार्‍याचा परिणाम म्हणून यंदाचा उन्हाळा अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. मंगळवारी 33 डिग्री तापमानाची नोंद झाली. गेले दोन दिवस थंड वारे वाहत आहेत. पहाटेचे वातावरण थंडीचे तर सूर्यनारायण जसजसा वर येईल तसे उष्णता वाढत आहे. शहरातील बाजारपेठेत सकाळी 10 नंतर ग्राहकांची गर्दी कमी झाल्याचे दिसून येत आहे. सायंकाळी 6 ते 7 नंतर ग्राहकांचे पाय बाजारपेठेकडे वळत आहेत. ही परिस्थिती गतवर्षी मार्च महिन्यात होती. मात्र, यंदा उन्हाळ्याची चाहूल फेबु्रवारीच्या मध्यंतरालाच आली आहे.