Thu, Jul 18, 2019 04:55होमपेज › Belgaon › शहरातील ‘भगव्या’ पताका हटविल्या

शहरातील ‘भगव्या’ पताका हटविल्या

Published On: Apr 07 2018 1:40AM | Last Updated: Apr 06 2018 10:36PMबेळगाव : प्रतिनिधी

शहरातील मराठी भाषिक भागात लावण्यात आलेल्या भगव्या पताका मनपाच्या कर्मचार्‍यांनी आचारसंहितेमुळे हटविल्या. यामुळे मराठी भाषिकांतून संताप व्यक्‍त करण्यात येत आहे. येत्या शिवजयंती उत्सवालादेखील निवडणूक आचारसंहितेचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शहरात नुकताच झालेल्या रामनवमी व हनुमान जयंतीनिमित्त वेगवेगळ्या गल्लीतून भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. त्यांच्यावर मनपाची वक्रदृष्टी वळली असून शुक्रवारी सदर कारवाई करण्यात आली. बापट गल्ली, कार पार्कींग परिसरात लावण्यात आलेल्या पताका काढण्यात आल्या.
आचारसंहितेचा बडगा उगारत ग्रामीण भागातही मंदिर, पुतळे याठिकाणी उभारण्यात आलेले भगवे ध्वज उतरविण्याचे प्रकार प्रशासनाने चालविले आहेत.

त्याला नागरिकांतून विरोध करण्यात येत आहे. निवडणुकीच्या नावाखाली खासगी संस्था अथवा मंदिर परिसरात लावण्यात आलेले ध्वज, पताका हटवू नयेत. धार्मिक कार्यक्रम साजरी करण्यावर निर्बंध आणू नयेत, अशी मागणी करण्यात येत आहे. शहरात परंपरेने शिवजयंती मोठ्या उत्साहात  साजरी करण्यात येते. यावर्षी 17 एप्रिल रोजी शिवजयंती उत्सव आहे. त्याकाळात देखील आचारसंहितेच्या नावाखाली अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने धार्मिक कार्यक्रमात आचारसंहितेचा बडगा उचलत कारवाई करू नये, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.